रविवार ठरला नोटवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

ठाणे-  हक्काच्या सुटीच्या दिवशी अनेकांना पहाटे घराबाहेर पडून नोटांसाठी बॅंकेबाहेरच्या रांगेत उभे राहावे लागले. बहुसंख्य मध्यमवर्गीयांचा वेळ यातच गेला. शहरात काही खासगी बॅंकांचे एटीएम सुरू झाल्याने त्याभोवती बॅंकांप्रमाणे रांगा दिसत होत्या. बहुसंख्य बॅंकांत दुपारी खडखडाट झाला. तशीच अवस्था एटीएमची होती. 

नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना दोन हजारांवरच समाधान मानावे लागले, तर अनेक लगीनघाईत असलेल्यांना परिसरातील "नावाजलेल्यां'च्या शब्दामुळे काहीसा दिलासा मिळाला. 

ठाण्यात अनेक ठिकाणी सोमवारच्या तुळशीच्या लग्नानंतर मुहूर्ताची लगीनघाई आहे. सरकारकडून भलेही जास्तीत जास्त व्यवहार धनादेश अथवा कार्डाच्या माध्यमातून करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मानसिकतेत जाण्यासाठी बराच अवधी जाणार आहे. अशा लगीनघाईत असलेल्या घरांत 500 आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द होण्यापूर्वी पाच ते 10 लाखांपर्यंतची रक्कम बॅंकांतून घरात ठेवण्यात आली आहे. काही जणांनी ओळखीच्यांकडून अथवा व्याजावर पैसे घेतले आहेत. बॅंकांतून काढलेले पैसे पुन्हा बॅंकेत भरण्यास अडचण नाही. 

व्याजावर घेतलेल्या पैशांमुळे अनेकांची अडचण झाली आहे. अशा कात्रीत सापडलेल्यांना परिसरातील नामांकित व्यक्ती अथवा राजकारण्यांकडून दिलासा दिला जात आहे. संबंधित व्यक्तीकडून सध्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारून नंतर बॅंक अथवा जुन्या नोटांच्या बदल्यात व्यवहार पूर्ण करण्याचा "शब्द' विक्रेत्यांना अथवा सेवा पुरवठादारांना दिला जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात धनादेश तर काही प्रमाणात या जाणत्यांच्या शब्दावर शुभकार्य रेटण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, त्याचवेळी यंदाच्या लग्नाच्या मोसमात मर्यादित रक्कम हाती आल्याने वारेमाप खर्चाला कात्री बसणार असल्याचे मानले जात आहे. 

रविवारी बॅंकांसमोर रांगा लागलेल्या होत्या. एरवी मॉलसारख्या ओसंडून वाहणाऱ्या ठिकाणीही तुरळक गर्दी होती. कारण बहुसंख्य नागरिकांचा वेळ दोन अथवा चार हजार बॅंकेतून मिळवण्यात गेला. रविवार असतानाही कार्ड पेमेंटची सुविधा नसलेल्या चाकरमान्यांनी घराच्या जेवणावरच ताव मारणे पसंत केले. काही जणांनी बॅंकेतील मित्र मंडळींकडून अतिरिक्त चलनी नोटा मिळवण्याचा प्रयत्न केला. बहुसंख्यांच्या पदरी निराशा आली.