बेकायदा बांधकामांचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अचानक आलेला बदल आमच्या लक्षात आला आहे. काही अधिकारी व कर्मचारी कामावर येण्याची व जेवणाची वेळ पाळत नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

नवी मुंबई - तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर गावठाणांसह शहरातील भूमाफियांनी डोके वर काढले असून बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू केला आहे. घणसोलीतील गोठिवली, ऐरोली, कोपरखैरणे येथील बेकायदा इमारतींची थांबलेली बांधकामे पुन्हा सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांतील कर्मचारी व अधिकारीही सुस्तावले असल्याने त्यांचे फावले आहे. पालिका कर्मचारी कामावर येण्याच्या वेळा तर पाळत नाहीतच; याशिवाय कामेही संथ गतीने करत असल्यामुळे पालिकेचा कारभारही ढेपाळला आहे. 

कडक शिस्तीचे अधिकारी अशी ख्याती असलेले तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथम बेशिस्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावली होती. लेटलतिफांना पगार कापून दणका दिला होता. घोटाळेबाज अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. बेकायदा बांधकामांमुळे बिघडलेले नियोजन रुळावर आणण्यासाठी भूमाफियांविरोधात मोहीम उघडली होती. दहा महिन्यांत सुमारे साडेतीन हजार बेकायदा बांधकामे व झोपड्यांवर हातोडा चालवला होता. मुंढेंच्या या धडक कारवाईमुळे भूमाफियांसह झोपडीदादांची पाचावर धारण बसली होती. अनेकांनी तर नवी मुंबईतून पलायन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु मुंढेंची बदली झाल्यानंतर शहरात बसलेली शिस्त व नियमांची घडी आता विस्कटण्यास सुरुवात झाली आहे. भूमाफियांनी पुन्हा डोके वर काढून बेकायदा बांधकामांना सुरुवात केली आहे. घणसोली, गोठिवली, ऐरोली, कोपरखैरणे, दिघा परिसरात पुन्हा बेकायदा बांधकामे सुरू झाली आहेत. काही भूखंडांवर पुन्हा झोपड्यांचे बस्तान बसवण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका मुख्यालय व विभाग कार्यालयात कर्मचाऱ्यांना लावलेली शिस्तही बिघडली आहे. अधिकारी व कर्मचारी कामावर येण्याची वेळ पाळत नाहीत. ओळखपत्र गळ्यात घालत नाहीत. यामुळे अधिकारी व कर्मचारी कोण आणि नागरिक कोण हेच कळत नाही. जेवणाच्या वेळेत कर्मचाऱ्यांचा टाईमपास पुन्हा सुरू झाला आहे. 

प्रामाणिक अधिकाऱ्यांची गळचेपी!

बेशिस्त कर्मचारी व लोकप्रतिनिधींना कायद्याचा धाक दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी तुकाराम मुंढे ठामपणे उभे राहत होते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व राजकीय दबावाला न जुमानता बेधडक कारवाई केली होती. परंतु आता मुंढेंच्या काळात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंढेंच्या बदलीनंतर लोकप्रतिनिधींनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांची गळचेपी होत आहे.

Web Title: illegal constructions