उद्योगांच्या गरजेनुसार आयटीआय अभ्यासक्रम

- किरण कारंडे
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील उद्योगांच्या गरजांनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) अभ्यासक्रमात बदल करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे उद्योगांना स्थानिक पातळीवरील आयटीआयकडून आवश्‍यकतेनुसार कुशल मनुष्यबळ मिळू शकेल.

मुंबई - राज्यातील उद्योगांच्या गरजांनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) अभ्यासक्रमात बदल करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे उद्योगांना स्थानिक पातळीवरील आयटीआयकडून आवश्‍यकतेनुसार कुशल मनुष्यबळ मिळू शकेल.

महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीअंतर्गत आयटीआय अभ्यासक्रमांना स्वायत्तता देण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याने त्याचा फायदा उद्योगांना आणि आयटीआयमधून बाहेर पडलेल्या उमेदवारांना होईल. स्वायत्तता मिळाल्यामुळे आयटीआय गरजेनुसार काही अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम घेऊ शकतात. आयटीआयशी संबंधित अनेक निर्णय, तसेच प्रशासकीय कामांचे निर्णयही सर्वसाधारण बैठकीत बहुमताने घेणे शक्‍य होईल.

राज्यातील 417 आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भारत फोर्ज कंपनीने खेड आयटीआयसाठी यंत्रे खरेदी करून दिली आहेत. वोक्‍स वॅगनने पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षणासाठी खोल्या बांधून दिल्या आहेत; तर बॉश, टाटा कंपनीही आयटीआयच्या सक्षमीकरणासाठी मदत करणार आहे. टाटा ट्रस्टने सामाजिक बांधिलकी म्हणून तीस आयटीआयमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळताना स्पर्धेत टिकण्यासाठी मदत होईल, असे राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी सांगितले.

अनेकदा उद्योगांना आवश्‍यक असलेले कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर मिळत नाही. कंपन्यांना आवश्‍यक असलेले कौशल्य आणि आयटीआयचे प्रशिक्षण यात तफावत असते. ती तफावत दूर करण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक योगेश पाटील यांनी सांगितले. अनेकदा उद्योगांना सीएनसी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची गरज असते. अशावेळी आयटीआयने प्रमाणपत्र दिल्यास या विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकेल, असेही ते म्हणाले.

उद्योग आणि आयटीआय यांच्यात 30 सामंजस्य करार झाले आहेत. त्यापैकी 24 करारांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकाधिक आयटीआय उद्योगांशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे.
- दीपक कपूर, प्रधान सचिव, कौशल्य विकास विभाग, महाराष्ट्र.

Web Title: Industry needs ITI courses