भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी केवळ बोलबच्चन : जोगेंद्र कवाडे

दिनेश गोगी
शनिवार, 21 एप्रिल 2018

निवडणुकीपूर्वी गरिबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, निवडणुकीनंतर गरिबांना गरीब ठेवण्याचे आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे काम करणारे भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ बोलबच्चन आहेत.

- जोगेंद्र कवाडे

उल्हासनगर : निवडणुकीपूर्वी गरिबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, निवडणुकीनंतर गरिबांना गरीब ठेवण्याचे आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे काम करणारे भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ बोलबच्चन आहेत, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा जोगेंद्र कवाडे यांनी केला.

कॅम्प नंबर 1 मधील बसस्टॉपवर पीआरपीचे अध्यक्ष पंडित निकम यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कवाडे बोलत होते.

कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. अहिष्णूता वाढली आहे. श्रीमंतांना अभय देऊन गरिबांना बहुजनांना आतंकित करण्याचे नियोजनबद्ध काम सुरू आहे. अॅक्ट्रॉसिटी गुन्ह्याला कमकुवत करण्यात आले आहे, असे मत व्यक्त करताना कश्मीरमध्ये एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. बलात्काराच्या अनेक घटना घडल्या. या घटनांचा निषेध करण्यासाठी भाजपा नेते रस्त्यावर उतरत नाहीत. तर आरोपींना वाचवण्यासाठी किंबहुना ते निर्दोष असल्याच्या मागणीच्या मोर्चात ही मंडळी सहभागी होतात, अशी खंत देखील कवाडे यांनी व्यक्त केली.

बलात्कारांच्या घटनांनी संपूर्ण जगात आपल्या देशाची बदनामी झाली आहे. काही देशांनी याचा निषेध केला आहे. मात्र, लहान सहान गोष्टी ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत ट्विट का करत नाहीत ? असा सवाल जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा उल्हासनगरचे नगरसेवक प्रमोद टाले,ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष जया रिजवानी,शहर अध्यक्ष पंडित निकम,पदाधिकारी सुनील सोनवणे,दीपक खोब्रागडे,संजय निकम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Jogendra Kavade Criticizes BJP and Narendra Modi