'अधिकारी, गोल्डन गँगचं साटंलोटं असल्याने विकासाला खीळ'

सुचिता करमरकर
रविवार, 18 जून 2017

जल अभियंता चंद्रकांत कोलते गोल्डन गँगला निविदेसंदर्भात माहिती पुरवतात असे सभापतींनी आरोपात म्हटले आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील भ्रष्टाचार तेथील टेंडरची केली जाणारी रिंग याची आत्तापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होत होती. मात्र स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी भर सभेत यावर भाष्य करत हा विषय पटलावर आणला. पालिकेतील अधिकारी आणि गोल्डन गँग यांचं साटलोट असल्यानेच पालिकेच्या विकास कामांना खीळ बसत असल्याचे सांगत म्हात्रे यांनी स्थायी समितीची सभ तहकूब केली. 

पालिकेतील भ्रष्टाचार तसेच घोटाळ्याच्या अनेक प्रकरणांची वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरु आहे. कोणत्याही कामाची फाइल अनेक टेबलांवर फिरते जेथे कामाच्या अरुण  रकमेच्या चाळीस ते बेचाळीस टक्के रक्कम पालिकेत वाटावी लागते. अशा अनेक चर्चा पालिकेत दबक्या आवाजात होतात. टेंडर मॅनेज केली जातात असेही बोलले जाते. मात्र स्थायी समिती सभापतींनी गोल्डन गँग आणि पालिकेतील अधिकारी यांच्यात असलेल्या हातमिळवणीचा परिणाम विकास कामांवर होत असल्याचा थेट आरोप केला आणि एकच खळबळ उडाली.
जल अभियंता चंद्रकांत कोलते गोल्डन गँगला निविदेसंदर्भात माहिती पुरवतात असे सभापतींनी आरोपात म्हटले आहे. यामुळे पालिकेची कामे फक्त मर्जीतल्या ठेकेदारांनाच मिळतात किंबहूना ती तशी मॅनेज न झाल्यास ती निविदा परत काढली जाते. याच कारणांमुळे पालिकेत नविन ठेकेदार कामे करायला उत्सुक नसतात. यामुळे पालिकेच्या विकास कामांना खीळ बसते असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

स्थायी समिती सभापतींनी केलेल्या आरोपांमुळे त्यांचे स्वकीयच अडचणीत आले आहेत. किंबहूना हा आरोप करताना त्यांनी आपल्याच पक्षातील काहींकडे  बोटे दाखवली आहेत. खरं तर ही वर्चस्वाची लढाई आहे. पालिकेत पदाधिकारी म्हणून विराजमान झालेले आणि सेनेतील काही बलाढ्य हे या लढाईत एकमेकांविरोधात आहेत. आता याचा फायदा नागरिकांना काय आणि कसा होणार असा सवाल आहे.