रस्ते आणि विसर्जन व्यवस्थेवर नाराजी

सुचिता करमरकर
रविवार, 20 ऑगस्ट 2017

कल्याण - कल्याण शहरातील रस्त्यांच्या आणि विसर्जन घाटांच्या दुरावस्थेवर कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याणचे पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आढावा बैठक झाली. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवा संदर्भात अनेक अडचणी यावेळी मांडल्या. 

कल्याण - कल्याण शहरातील रस्त्यांच्या आणि विसर्जन घाटांच्या दुरावस्थेवर कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याणचे पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आढावा बैठक झाली. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवा संदर्भात अनेक अडचणी यावेळी मांडल्या. 

आयकॉन प्लाझा येथे उपायुक्त डॉ संजय शिंदे यांच्यासह कल्याण डोंबिवली पालिकेचे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव कालावधीत करण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल तसेच सोयी सुविधांबाबतची माहिती सुरुवातीस देण्यात आली. मात्र तात्पुरत्या स्वरुपात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणी खड्डे बुजवल्यानंतर सध्या पडत असलेल्या पावसाने रस्ते पुन्हा खराब झाल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याप्रमाणे वाहतूक कोंडी तसेच त्याबाबत नियोजन केले जात नसल्याने अनेक अडचणी मांडण्यात आल्या. या तक्रारींवर उत्तर देताना शहर अभियंता कुलकर्णी यांनी रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. मेळा संघाचे अध्यक्ष धनंजय पानेरकर यांनी विसर्जन तलावातील जलपर्णी तसेच तेथील सफाईकडे लक्ष दिले जात नसल्याचे सांगितले. तलावांची तसेच परिसराच्या सफाईचे काम सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कल्याण पूर्वेत तीन तर पश्चिमेत एका कृत्रिम तलावाचे काम सुरु आहे. याशिवाय घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठीही टाक्यांचा वापर करुन तलाव तयार होत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे यांनी विसर्जन करणाऱ्या कोळी बांधवांना काही मानधन दिले जावे असा मुद्दा यावेळी मांडला. मात्र हे मानधन नेमके कोण देणार हे मात्र स्पष्ट करण्यात आले नाही. 

दोन सप्टेंबर रोजी बकरी ईद आहे. त्याअनुषंगाने सुरक्षा व्यवस्था तैनात केली जावी असा मुद्दा सर्फुद्दीन कर्ते यांनी मांडला. याच दिवशी कल्याणात मेळा संघाच्या गणपतींचे विसर्जन आहे. या दोनही सणांचा विचार करत सुरक्षेची काळजी घेतली जाईल असे आश्वासन पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी दिले.

Web Title: kalyan mumbai news resentment road & visarjan management