कल्याण: श्रीराम टॉकीज ते वाशी बस सुरू झाल्याने समाधान: महापौर

रविंद्र खरात
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

कल्याण पूर्व मधील गणपती चौक ते चिंचपाडा मार्गावर केडीएमटी बस सुरू झाल्यानंतर रविवार ता 12 नोव्हेंबर पासून कल्याण पूर्व श्रीराम टॉकीज ते वाशी मार्गावर केडीएमटी बस सोडण्यात आली.

कल्याण : उल्हासनगर आणि कल्याण पूर्व मधून अनेक तरुण तरुणी नोकरी आणि शिक्षणासाठी नवी मुंबईत जातात म्हणून त्यांना कल्याण पूर्व मधून केडीएमटी बससेवा सुरू व्हावी यासाठी युवा सेना मार्फत मागणी होत होती त्यांची आज मागणी पूर्ण केल्याचे समाधान महापौर राजेंद्र देवळेकर यांनी कल्याण पूर्व मधील एका कार्यक्रमात केले.

कल्याण पूर्व मधील गणपती चौक ते चिंचपाडा मार्गावर केडीएमटी बस सुरू झाल्यानंतर रविवार ता 12 नोव्हेंबर पासून कल्याण पूर्व श्रीराम टॉकीज ते वाशी मार्गावर केडीएमटी बस सोडण्यात आली. यावेळी परिवहन समिती सभापती संजय पावशे, परिवहन सदस्य मधुकर यशवंतराव, राजेंद्र दिक्षित, शिवसेना पालिका गटनेते रमेश जाधव, युवा सरचिटणीस वरूण सरदेसाई, उल्हासनगर मनपा विरोधी पक्ष नेता धनंजय बोडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे युवकांसाठी चांगले काम करत असून त्यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर मधील युवा सेना पदाधिकारी जोमाने काम करत असून उल्हासनगर आणि कल्याण पूर्वमध्ये राहणारे अनेक तरुण तरुणी शिक्षणासाठी आणि नोकरी निमित्त नवी मुंबईत जात असतात. त्यांच्यासाठी बस संदर्भात पाठपुरावा आणि त्याची पुर्तता झाली असून कल्याण पूर्व मधून कल्याण पश्चिम बिर्ला कॉलेज बस ही सुरू करण्याच्या सूचना महापौर राजेंद्र देवळेकर यांनी परिवहन विभागाला दिल्या ,यावेळी काही अंतरावर मान्यवरांनी बसने प्रवास केला.

कल्याण पूर्व श्रीराम टॉकीज ते वाशी मार्गावर सकाळी सव्वा आठ वाजता बस सोडण्यात येईल तर वाशी ते कल्याण पूर्व सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास बस धावेल . प्रतिसाद पाहून बसेस वाढविण्यात येणार आहे.