'मौत का कुआ'त स्टंटबाज तरूणी कारखाली जायबंदी

मयुरी चव्हाण-काकडे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

शिवानी गजभिये असे जखमी तरूणीचे नाव असून कोनमधील वेद हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंज देत आहे. या तरूणीच्या डोके व शरीराच्या इतर भागास गंभीर दुखापत झाली आहे. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडीदेवीचा सद्या उत्सव सुरू आहे. याठिकाणी एका कारमधून बाहेर येऊन एक तरूणी स्टंट करत होती.

कल्याण : नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गाडी किल्ला परिसरात दरवर्षी जत्रेचे आयोजन करण्यात येते. यंदा आयोजित करण्यात आलेल्या जत्रेत अनुचित प्रकार घडला असून मौत का कुआ हा खेळ एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची घटना सोमवारी घडली. खेळाचे प्रदर्शन करताना स्टंटबाज तरुणी कारखाली येऊन गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

शिवानी गजभिये असे जखमी तरूणीचे नाव असून कोनमधील वेद हॉस्पिटलमध्ये मृत्युशी झुंज देत आहे. या तरूणीच्या डोके व शरीराच्या इतर भागास गंभीर दुखापत झाली आहे. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडीदेवीचा सद्या उत्सव सुरू आहे. याठिकाणी एका कारमधून बाहेर येऊन एक तरूणी स्टंट करत होती. या कारच्या मागे भरधाव वेगात दोन दुचाक्याही फिरत होत्या. त्याच दरम्यान ही तरूणी कारच्या बाहेर येऊन कुव्याचा सभोवताली उभ्या असलेल्या लोकांकडून बक्षिसांचे पैसे स्विकारत होती. मात्र तोल गेल्याने अचानक बाहेर पडलेल्या या तरूणीचा पाय कुव्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या लोखंडी पट्टयांमध्ये अडकल्याने  कुव्याला उलट्या लटकलेल्या या तरूणीच्या अंगावरून दुचाकीपाठोपाठ ज्या कारमधून स्टंट करीत होती तीच कार भरधाव वेगात गेल्याने ती गंभीत जखमी झाली आहे.

खेळ पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी या तरुणीला सोडविले. हा सर्व काळजाचा ठोका चुकविणारा थरारक प्रकार बघ्यांच्या मोबाइलमध्ये चित्रित झाला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात  आली आहे. 

Web Title: Kalyan news girl injured in stunt