कल्याण: परिवहन उपक्रमाच्या प्रभारी कार्यशाळा प्रमुखाचा राजीनामा? 

रविंद्र खरात
रविवार, 24 सप्टेंबर 2017

कार्यशाळा प्रमुख अनंत कदम यांचा राजीनामा आस्थापना विभाग विधी विभागाकडे पाठविला. विधी विभागाने अहवाल दिल्यावर पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. 

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या नादुरुस्त बसेसची दुरुस्ती खासगी ठेकेदारमार्फत केली जात असून त्याचा ठेक्याची मुदत संपल्याने नव्याने दुरुस्तीचे काम संबधित ठेकेदाराने नकार दिल्याची घटना ताजी असताना परिवहन उपक्रमाच्या प्रभारी कार्यशाळा प्रमुख अनंत कदम यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने केडीएमटी उपक्रमात एकच खळबळ माजली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या ताप्यात सध्या 218 बसेस आहेत, त्यातील शेकडो बसेस खराब असल्याने 70 ते 80 बसेस डेपो बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. बसेस दुरुस्तीचे काम एका ठेकेदारांमार्फत केले जात होते. त्याची मुदत संपल्याने त्याने काम करण्यास नकार दिल्याने शेकडो बसेस धूळ खात पडल्या असून पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी खासगी ठेकेदार मार्फत काम करण्यास कात्री लावली असून चांगल्या बसेस उपलब्ध आहेत. त्यावर काम चालवा असे आदेश दिले होते, बसेस दुरुस्ती करण्यासाठी केडीएमटीकडे बोटावर मोजण्याइतके कर्मचारी असून त्यावर शेकडो बसेस डेपो बाहेर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक सूचना देऊन ही प्रशासनाने आपल्यावर खापर फोडून केडीएमटीमधून बाहेर काढण्या अगोदरच केडीएमटी प्रभारी कार्यशाळा प्रमुख अनंत कदम यांनी तडकाफडकी राजीनामा महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याकडे दिल्याने केडीएमटी कर्मचारी मध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

कार्यशाळा प्रमुख अनंत कदम यांचा राजीनामा आस्थापना विभाग विधी विभागाकडे पाठविला. विधी विभागाने अहवाल दिल्यावर पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. 

कुठल्याही राजकारणाला बळी न पडता, घरगुती कारणास्तव राजीनामा दिल्याची कबुली केडीएमटी प्रभारी कार्यशाळा प्रमुख अनंत कदम यांनी दिली.

हा केडीएमटी प्रशासनाचा स्टंट आहे, कार्यशाळा प्रमुख अनंत कदमाचा फुकट बळी जात आहे. खरे म्हणजे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ही परिस्थिती झाली असून याबाबत लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन टेकाळे यांची बदलीची मागणी करणार असल्याची माहिती परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी दिली आहे.

Web Title: Kalyan news KDMT bus