कल्याण: बल्याणी चौक-टिटवाला रेल्वे स्थानक बससेवेला 15 जुलैपासून प्रारंभ

रविंद्र खरात
रविवार, 2 जुलै 2017

येत्या 15 जुलैपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बल्याणी चौक ते टिटवाला रेल्वे स्थानक बससेवा सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून ही बस सुरू करण्याची मागणी होती. ही बस गणपती मंदिर मार्गे जाणार आहे.

कल्याण - येत्या 15 जुलैपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बल्याणी चौक ते टिटवाला रेल्वे स्थानक बससेवा सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून ही बस सुरू करण्याची मागणी होती. ही बस गणपती मंदिर मार्गे जाणार आहे, याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे समिती सभापती संजय पावशे यांनी दिली.

टिटवालामधील वाजपेयी चौक-टिटवाला रेल्वे स्थानक व्हाया टिटवाला गणेश मंदिर या मार्गावरील बससेवेचे 25 एप्रिल 2017 रोजी उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि पावशे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. मात्र या मार्गावर सुरुवातीला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. टिटवाला रेल्वे स्थानक ते टिटवाला गणपती मंदिरापर्यंत दहा रुपये तिकिट आकारण्यात येत असल्याचे प्रवाशी वर्गाने पाठ या मार्गाकडे पाठ फिरविली. दरम्यान कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीमधील बल्याणी आणि मोहिली परिसर मध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. येथील नागरिकांना टिटवाला रेल्वे स्थानक जवळ आहे. हे स्थानक गाठण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.

या परिसरामध्ये सार्वजनिक बससेवा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव नागरिकाना खासगी वाहन किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. त्यासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे या परिसरामध्ये बल्याणी चौक ते टिटवाला रेल्वे स्थानक व्हाया गणपती मंदिर अशी बससेवा सुरु करावी, अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेना अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांनी केडीएमटी प्रशासनकडे केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने बल्याणी ते टिटवाला रेल्वे स्थानक व्हाया टिटवाला गणेश मंदिर सर्व्हे केला असून या महिन्यात 15 जुलै पासून या मार्गावर धावणार असल्याची माहिती सभापती संजय पावशे यांनी सकाळ ला दिली.

टिटवाला रेल्वे स्थानक ते टिटवाला गणेश मंदिर 10 ऐवजी 5 रुपये तिकीट?
टिटवाला रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर 10 रुपये ऐवजी 5 रुपये तिकीट दर करावे अशी मागणी परिवहन कामगार कर्मचारी संघर्ष सेना अध्यक्ष बुधाराम सरनोबत यांच्या समवेत परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी केडीएमटी प्रशासनकडे केली होती. या पार्श्‍वभूमीवर केडीएमटीने सर्व्हे केला असून याबाबत जुलै महिन्याच्या अखेरिस धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती सभापती संजय पावशे यांनी दिली.