कल्याणमध्ये बिल्डरचा अधिकाऱ्यांना हाताशी धरून चाळी पाडण्याचा प्रयत्न

सुचिता करमरकर
शुक्रवार, 16 जून 2017

कल्याण - महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन खाजगी जमिनीवरील चाळी पाडून टोलेजंग इमारती उभारण्याचा एका बिल्डरचा (विकसक) कट आज (शुक्रवार) उघड झाला. कल्याण पूर्व भागातील भगवाननगर परिसरातील नागरिक या प्रकारामुळे बाधित होणार होते. संभाव्य बाधित कुटुंबियांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे आपली कैफिअत मांडली.

कल्याण - महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन खाजगी जमिनीवरील चाळी पाडून टोलेजंग इमारती उभारण्याचा एका बिल्डरचा (विकसक) कट आज (शुक्रवार) उघड झाला. कल्याण पूर्व भागातील भगवाननगर परिसरातील नागरिक या प्रकारामुळे बाधित होणार होते. संभाव्य बाधित कुटुंबियांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे आपली कैफिअत मांडली.

कल्याण पूर्व भागातील भगवाननगर येथे 25 वर्षांपूर्वी चाळी बांधण्यात आल्या. करार करुन त्यांची रितसर विक्री केली गेली. मात्र आता मूळ जमीन मालकाच्या वारसांबरोबर साठे करार करत सुरेंद्रमल त्रिपाठी या विकसकाने चाळीतील 52 कुटूंबांना जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. यासाठी त्याने चक्क पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे. हा पसिर "ड प्रभाग' क्षेत्रांतर्गत येतो. चार जून 2016 रोजी या प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या अनधिकृत बांधकाम विभागाने नागरिकांचे पुनर्वसन केले करण्यासाठी बांधकामे पाडली जावीत, असा अभिप्राय दिला होता. त्याच प्रभागातील प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याने चौदा जून 2017 रोजी नागरिकांना घरे खाली करण्याची नोटीस दिली आहे. घरे रिकामी न केल्यास वीस जूनला ती बांधकामे पाडली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थानिक कार्यकर्ते सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या चाळकरी नागरिकांनी प्रथम प्रभाग क्षेत्र कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे नागरिक महापौरांना भेटायला आले. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी चर्चा करुन त्यांनी या चाळीतील नागरिकांची घरे पाडली जाणार नाहीत असे आश्वासन दिले. ज्या भगवान नगर परिसरात या चाळी आहेत तेथे सध्या पालिकेच्या कोणत्याही प्रकल्पाचे काम सुरू नाही. तेथे रस्ता रुंदीकरणही नाही. अशावेळी एखाद्या खाजगी विकसकासाठी पालिका अधिकाऱ्यांनी बांधकामे पाडण्याची नोटीस का दिली? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. खाजगी विकसकांसाठी पालिका पायघड्या घालते आणि सामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडते हेच या प्रकारातून स्पष्ट होत आहे.