शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाप्रमाणे मंत्री काम करत आहेत: रविंद्र चव्हाण

रविंद्र खरात
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील आयोजित कल्याण पूर्व मधील नूतन ज्ञानमंदीर शाळेत दोन दिवसीय शिवकालीन शस्रास्रे प्रदर्शन आयोजित केले असून त्याचे उदघाटन आज (शनिवार)  राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

कल्याण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीत आणि नंतर त्यांच्या अष्टप्रधान मंडळाची चर्चा होती तशाच पद्धतीनें मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील प्रत्येक मंत्री लोकहिताचे काम करत असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वमधील एका कार्यक्रमात केले. 

भाजपा कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील आयोजित कल्याण पूर्व मधील नूतन ज्ञानमंदीर शाळेत दोन दिवसीय शिवकालीन शस्रास्रे प्रदर्शन आयोजित केले असून त्याचे उदघाटन आज (शनिवार)  राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शन पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रदर्शन आयोजक संजय मोरे, संतोष पाटील तसेच शस्र संग्रहित करणारे सुनील कदम यांचे कौतुक करत आपल्या भाषणात पुढे म्हणाले, की शस्त्र प्रदर्शन पाहून आनंद झाला, यातून एकच सिद्ध होते की शिवाजी महाराज यांनी केलेली प्रत्येक लढाई महत्त्वपूर्ण होती आणि वेळेनुसार त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी विविध शस्राचा वापर करत लढाई जिंकली आहे. असे सांगत राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले की पुढच्या तरुण पिढीला शिवाजी महाराजाचा इतिहास समजावा यासाठी केंद्र आणि राज्यसरकारने सुमारे 600 कोटींची तरतूद करत रायगड सहित राज्यातील गड किल्ल्याचे संवर्धन करणार आहे. कल्याणमध्ये शिवाजी महाराज येऊन गेले आहेत. त्यामुळे एक वेगळा वारसा आहे आरमार आणि किल्ले बाबत शिवाजी महाराज आग्रही होते. लोकसभा निवडणूक प्रचारापूर्वी नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आणि शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळ जे जनतेसाठी काम करत होते त्याप्रमाणे आज मोदी आणि फडणवीस सरकार मधील मंत्री काम करत असल्याचे यावेळी स्पष्ट करत शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य अनुभव देशातील सर्व नागरीक घेतील असा दावा ही यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला.

यावेळी कल्याण पूर्वमधील युवा नेते वैभव गायकवाड यांचा आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला तर व्यासपीठावर संजय मोरे, नाना सुर्यवंशी, सुभाष म्हस्के, हेमलता पावशे, सुमित्रा नायडू, कमल पंजाबी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संदीप तांबे यांनी केले. प्रदर्शन दोन दिवस चालणार असून पहिल्याच दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांनी चांगलीच गर्दी केली होती.