कल्याण: पालिकेच्या पथकाकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई

रविंद्र खरात 
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

राज्य शासनाच्या धोरणानुसार स्टेशन परिसर आणि फुटपाथ वरील फेरीवाला हटाव बाबत शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, नगरसेवकांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धोरण बाबत मंजुऱ्या ही दिल्या आहेत आता प्रशासनाने अंमलबजावणी न केल्यास सभागृहात जाब विचारू असा इशारा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिला आहे.

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरमधील फुटपाथ आणि स्कायवॉकवरील फेरीवाल्यांविरोधात शनिवारी मनसेच्या आंदोलनानंतर आज (रविवार) सकाळपासून फेरीवाल्यांविरोधात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या पथकाने कारवाई केली. त्यामुळे काही स्टेशन परिसर मोकळा होता. मात्र अशीच कारवाई सुरू राहिल्यास फेरीवाला संघटना आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना माजी नगरसेवक अरविंद्र मोरे यांनी दिल्याने फेरीवाला प्रश्नावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाला प्रश्नावर 15 दिवसाची मुदत रेल्वे प्रशासन आणि पालिकांना दिली. शनिवारी डेडलाईन संपल्याने कल्याण रेल्वे स्थानक परिसर फुटपाथ आणि स्कायवॉकवरील फेरीवाल्या विरोधात मनसे माजी आमदार प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई सह शेकडो मनसे कार्यकर्त्यानी हल्लाबोल केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा ही दाखल केला असला तरी मनसेने आपली भूमिका बदलली नसून त्या परिसरात फेरीवाले बसल्यास मनसे स्टाईलने समाचार घेऊ असा इशारा मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी दिला आहे. त्यामुळे स्टेशन परिसर आणि स्कायवॉकवर कडेकोट पोलिस बंदोबस्त असून आज पालिकेच्या फेरीवाला विरोधी पथकाने फेरीवाल्या विरोधात धडक कारवाई केली. मात्र पुन्हा पुन्हा फेरीवाले बसत असल्याने कारवाई फोल ठरली. मात्र फेरीवाला संघटनाही आक्रमक झाली असून पालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई केल्यास मोर्चे काढून निषेध व्यक्त करण्याचा इशारा दिल्याने फेरीवाला प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. 

आमच्यावर गुन्हे दाखल केले म्हणून गप्प बसणार नाही आमचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयन्त करू नये, फेरीवाला हटाव मोहीम पोलीस आणि पालिकेची आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशारा नंतरही फेरीवाले दिसल्याने आम्ही आंदोलन केले. मात्र यापुढे कल्याण स्टेशन परिसर फुटपाथ आणि स्कायवॉकवर फेरीवाले दिसल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा मनसे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी दिला आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार स्टेशन परिसर आणि फुटपाथ वरील फेरीवाला हटाव बाबत शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, नगरसेवकांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धोरण बाबत मंजुऱ्या ही दिल्या आहेत आता प्रशासनाने अंमलबजावणी न केल्यास सभागृहात जाब विचारू असा इशारा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिला आहे.

फेरीवाल्यांनी चोऱ्यामाऱ्या करायच्या का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वेच्या पुलावर आणि स्टेशनमध्ये फेरीवाले बसले तर आंदोलन करू असा इशारा दिला होता. मात्र मनसेवाले रस्त्यावर आंदोलन करत सर्व सामान्य फेरीवल्याना त्रास देत आहेत तो सहन केला जाणार नाही. आमचा ही स्कायवॉकवरील बसत असलेल्या फेरीवाल्यांना विरोध आहे. एकीकडे फेरीवल्याचे धोरण राबवियाचे नाही दुसरीकडे त्यांचे नुकसान करायचे हे सहन करणार नाही. आम्ही मोर्चे, आंदोलन करू असा इशारा शिवसेना माजी नगरसेवक, फेरीवाला संघटना नेते अरविंद्र मोरे यांनी दिला आहे.