एसटी कर्मचाऱ्यांचा बांध फुटला; भीक मांगो आंदोलन

रविंद्र खरात
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

शोकसभा, श्रद्धांजली ...
संपकाळात हृदयविकाराच्या झटक्याने एसटी कर्मचारी एकनाथ वाघचौरे यांचे निधन झाले यामुळे एसटी कर्मचारी वर्गात संतापाचे वातावरण आहे. कल्याण एसटी डेपोमध्ये आज सकाळी 12 च्या सुमारास संपकरी एसटी कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन शोकसभा घेत श्रद्धांजली वाहली. यावेळी संप संपल्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कल्याण : कल्याण एसटी डेपोमधील कर्मचारी वर्गाचा आज अखेर बांध फुटला. सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू राहिल्याने कर्मचारी वर्गाने आज (गुरुवार) काळी दिवाळी साजरी केली. यावेळी शोक सभा ते खासगी बसला विरोध आणि भीक मांगो आंदोलन, मुंडन करून आपला राग व्यक्त केला. यामुळे काही काळ एसटी डेपोमध्ये तणावाचे वातावरण होते.

सोमवार मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी वर्गाच्या मागणीकडे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि राज्य शासन लक्ष्य देत नसल्याने आज सकाळी कल्याण एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करत निषेध व्यक्त केला. 

शोकसभा, श्रद्धांजली ...
संपकाळात हृदयविकाराच्या झटक्याने एसटी कर्मचारी एकनाथ वाघचौरे यांचे निधन झाले यामुळे एसटी कर्मचारी वर्गात संतापाचे वातावरण आहे. कल्याण एसटी डेपोमध्ये आज सकाळी 12 च्या सुमारास संपकरी एसटी कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन शोकसभा घेत श्रद्धांजली वाहली. यावेळी संप संपल्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ऐन दिवाळीत संप करण्यास लावणाऱ्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने शिमगा ..
सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू असून मागण्या मान्य करण्याऐवजी संप मोडीत काढण्यासाठी प्रशासन आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे करत असल्याचा आरोप करत आज कल्याण एसटी डेपोमध्ये उग्र आंदोलन करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी मुंडन करत भीक मांगो आंदोलन केले. आम्हाला भीक नको, तुम्हाला खासगीकरणं करायचे आहे तर करा आम्ही चाललो घरी, अंगणवाडीच्या आंदोलन कर्त्या महिलांना भेटण्यास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वेळ आहे. मात्र आमची विचारपूस केली नसल्याची खंत एसटी कर्मचारी व्यक्त करत होते. परिवहन मंत्री दिवाकर यांचा निषेध करत जणू काही मयताला आलो असे दाखवीत काही कर्मचारी रडत आपला निषेध व्यक्त केला. 

खासगी बसला विरोध ....
सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू असताना मागण्या मान्य करण्याऐवजी स्थानिक प्रशासन ने आरटीओ आणि पोलिस बंदोबस्तात कल्याण एसटी डेपोमधून बसेस सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र संपकरी एसटी कर्मचारी वर्गाने विरोध केला. आमचा अंत पाहू नका, डेपो बाहेरून खुशाल बसेस सोडा, तुमच्या मंत्र्यांना खासगीकरण करायचे आहे ना? एकदा घोषित करा, आम्ही निघून जातो, तशी ही आमची येथेच दिवाळी गेली, अनेक जण घरी ही गेलो नाही, आम्ही कारागृहामध्ये जाऊ, येथेच मरू मात्र संप मागे घेणार नाही अशी भावना कर्मचारी पोलिस आणि आरटीओ अधिकारी समोर मांडल्या अखेर खासगी बसेस एसटी डेपो च्या बाहेर काढत तेथून सोडल्या.

सलग तिसऱ्या दिवशी संपकरी आक्रमक झाल्याने कल्याण एसटी डेपो मध्ये तणावाचे वातवरण झाले होते त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविला होता. तर मुंबई मधून काय निरोप येतो याकडे सर्व कर्मचारीवर्ग वाट पाहत होते मात्र दुपारपर्यंत हाती निराशा त्यांच्या आल्याने ते संताप व्यक्त करत होते.

Web Title: Kalyan news ST bus employee strike