कल्याण: तळोजा मेट्रोचे काम प्रगतीपथावर

metro
metro

कल्याण : तळोजामार्गे डोंबिवलीत येणाऱ्या मेट्रोचा प्रस्तावित आराखडा येत्या नऊ महिन्यात तयार होईल. एम एम आर डी ए ने या कामाचे आदेश दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला दिले आहेत. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना एका पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. 

डोंबिवलीला मेट्रोच्या नकाशावर आणण्याचे प्रयत्न असून येत्या नऊ महिन्यांमध्ये तळोजा डोंबिवली कल्याण या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होणार आहे. एमएमआरडीएने यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनची नियुक्ती केली आहे. खा शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्यावर्षी वीस ऑक्टोबर रोजी वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन या मेट्रोसाठी सादरीकरण केले होते. रेल्वे सेवा कोलमडल्यानंतर कल्याण डोंबिवली परिसरातील प्रवाशांसाठी मेट्रो हा अत्यंत गरजेचा पर्याय आहे. आज येथील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतों. ही वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. खा शिंदे यांनी कल्याणपर्यंत येणारी मेट्रो नवी मुंबई मेट्रोला तळोजा येथे डोंबिवली आणि शीळ मार्गे जोडावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्वरित या मार्गाला तत्वतः मंजुरी दिली होती.  गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात बैठक झाली असता त्यांनी सदर मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पहिल्या टप्प्यात घेण्याची ग्वाही दिली होती. त्यावर त्वरित या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची मागणी खा शिंदे यांनी केली होती.

त्यानुसार दिल्ली मेट्रोची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून येत्या ९नऊ महिन्यात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाणार असल्याचे एमएमआरडीएने पत्राद्वारे  कळवले आहे. 

त्यामुळे या प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा गाठला गेला असून डोंबिवलीकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. डोंबिवली बरोबरच कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ,  दिवा, सत्तावीस गावे, मुंब्रा, कौसा, नवी मुंबई पालिकेतून बाहेर पडलेली चौदा गावे अशा परिसराला या मेट्रोमुळे दळणवळणाच्या एका सेवेचा लाभ मिळेल. सुमारे वीस ते पंचवीस लाख नागरिकांना या मेट्रोचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com