हापूसच्या नावावर कर्नाटकमधील ‘रायवळ’ची विक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

डोंबिवली - कोकणातील हापूसची चव चाखण्यासाठी आतुरलेल्या डोंबिवलीतील ग्राहकांच्या माथी हापूससारखाच दिसणारा कर्नाटकातील दुय्यम आंबा मारला जात आहे. साधारणपणे गुणवत्तेनुसार ४०० ते १२०० रुपये डझनने देवगड व रत्नागिरीतील हापूस बाजारात मिळत आहे. त्याचा फायदा घेऊन स्वस्त दराचे प्रलोभन दाखवून हापूसच्या नावावर कर्नाटकमधील साधा आंबा खपवून रस्तोरस्ती ग्राहकांची लूट सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. देवगड व रत्नागिरीचे नाव असलेल्या पेट्यांतून हे आंबे विकणारी बंगाली टोळी सक्रिय असल्याचे काही अधिकृत हापूस विक्रेत्यांनी सांगितले.   

या वर्षी बाजारात कर्नाटकातील आंब्यांची मोठी आवक झाली आहे. १५ ते २० रुपये किलो किंवा ४०० रुपये शेकडा दराने कर्नाटकातील आंबा उत्पादकांकडून उचलला जातो. हा आंबा येथे विक्रीसाठी आणला जातो. हापूस प्रमाणेच लाकडी पेट्यांत भरून डोंबिवलीतील रस्त्यांच्या कडेला, पदपथ व नाक्‍या-नाक्‍यांवर विक्रेत्यांनी या आंब्यांची दुकाने थाटली आहेत. सुरुवातीला डझनाला ६०० रुपयांचा भाव सांगितला जातो. त्यानंतर घासाघीस करून १०० रुपये दराने तो ग्राहकांच्या गळ्यात मारला जातो. कर्नाटकातील हे आंबे विकणारी बंगाली टोळी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हापूस खरेदी करताना सावधगिरी बाळगा; अन्यथा फसवणूक होण्याची शक्‍यताच जास्त आहे.

कसा ओळखाल फरक?
- नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूसच्या देठाजवळ सुरकुती असते.
-  हापूस पिकल्यावर केशरी रंगाचा दिसत नाही.
-  हापूस नैसर्गिकरीत्या पिकवण्यासाठी नऊ दिवस लागतात.
-  कर्नाटकातील आंबा कृत्रिमरीत्या चार दिवसांत पिकवला जातो.
- या आंब्यावर सुरकुती पडत नाही. तसेच तो चमकदारही दिसतो.

रिकामी आंबा पेटी (लाकडी किंवा पुठ्ठ्याची) यंदा चौपट भावाने विकली जात आहे. कर्नाटक आंबा विकणारे बंगाली लोक इतर व्यापाऱ्यांच्या रिकाम्या पेट्या, ज्यावर देवगड, रत्नागिरी असे लिहिलेले असते, त्या दुप्पट भावाने विकत घेतात. त्या पेट्यांमध्ये ते कर्नाटकातील आंबा भरून विकत आहेत. डोंबिवलीकरांनी सावधपणे आंबा खरेदी करून फसवणूक टाळावी.
- धनंजय चाळके, हापूस विक्रेते