मधुर भांडारकरांच्या हत्येचा कट मॉडेलने रचल्याचे सिद्ध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

प्रीती जैनला तीन वर्षे तुरुंगवास; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय

प्रीती जैनला तीन वर्षे तुरुंगवास; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय
मुंबई - चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या प्रकरणात मॉडेल अभिनेत्री प्रीती जैन दोषी आढळली आहे. प्रीतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. प्रीतीने भांडारकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोपही केले होते.

प्रीतीने 2005 मध्ये दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची हत्या करण्याची सुपारी कुप्रसिद्ध अरुण गवळीला दिली होती. त्यासाठी गवळीचा हस्तक नरेश परदेशीकडे 70 हजार दिले होते. मात्र काम न झाल्याने ते पैसे तिने परत मागितले. गवळी टोळीने याबाबतची माहिती पोलिसांपर्यंत पोचवली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. सप्टेंबर 2005 मध्ये प्रीतीला अटक झाली. त्यानंतर वर्षभरानंतर तिने भांडारकर यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. नरेश परदेशीला अटक केल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी वर्सोवा पोलिस ठाण्याकडे निघालेल्या प्रीतीलाही अटक झाली होती. या हत्येसाठी बंदूक आणि काडतुसे दिल्याबद्दल नरेशचा साथीदार शिवराम दासलाही पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत प्रीतीने मारेकऱ्यांना पैसे दिल्याचे सिद्ध झाले. सुरवातीला या प्रकरणाची सुनावणी शिवडी सत्र न्यायालयात झाली. नंतर हे प्रकरण मुंबई सत्र न्यायालयाकडे सोपवण्यात आले होते.

भांडारकर यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने प्रीतीसह तिघांना दोषी ठरवले. गवळी टोळीतील दोघांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. प्रीतीसह तिघांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी दहा हजारांचा दंडही न्यायालयाने ठोठावला. या निर्णयावर उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभाही देण्यात आली आहे.