नोटाबंदीच्या विरोधात कॉंग्रेसचे आजपासून आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मुंबई - केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई कॉंग्रेसच्या वतीने उद्या (ता. 7) पासून दोन दिवस आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

निरुपम यांनी सांगितले, की गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील गरीब जनता अक्षरशः भरडली. स्वतःचेच पैसे बॅंकेतून काढताना 115 जणांना प्राण गमवावे लागले. या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे संपूर्ण देशात काळा दिवस पाळण्यात येणार आहे. 8 नोव्हेंबरला मुंबई कॉंग्रेसतर्फे सकाळी मोर्चा काढण्यात येणार आहे. नोटाबंदीमुळे मृत्युमुखी पडलेले लोकांसाठी भाजप सरकारचे आझाद मैदानात श्राद्ध घालण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 8 वाजता नोटाबंदीमुळे मृत्युमुखी पडलेल्या 115 निष्पाप लोकांसाठी जुहू बीचवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ श्रद्धांजली सभा होणार आहे. या कार्यक्रमाला अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी मोहन प्रकाश आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.