उपकरणांची खरेदी रखडली

उपकरणांची खरेदी रखडली

नवी मुंबई - कंत्राट मिळत नसल्याने चिडलेले कंत्राटदार गैरव्यवहार झाल्याच्या सतत तक्रारी करत असल्यामुळे महापालिकेची वैद्यकीय उपकरणांची खरेदी रखडली आहे. त्यामुळे महापालिकेने बांधलेली रुग्णालये ओस पडली असून, यामुळे नागरिकांना आरोग्य सेवाही पुरवणे अवघड जात आहे. चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने निविदा प्रक्रियेत सतत अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा तक्रारदारांना न्यायालयात खेचण्याची तयारी सुरू केली आहे. या मंडळींना यामुळे चांगलाच दणका बसण्याची शक्‍यता आहे.

नवी मुंबई पालिकेने शहरात २०१२ मध्ये नवीन रुग्णालयांसाठी इमारती बांधण्याचे काम सुरू केले. त्यात ऐरोली, नेरूळ, सीबीडी या तीन ठिकाणी रुग्णालयांच्या इमारती बांधल्या आहेत. ती सुरूही झाली आहेत; परंतु तेव्हापासून आजतागायत या रुग्णालयांसाठी आवश्‍यक वैद्यकीय उपकरणांची खरेदी झालेली नाही. त्यामुळे ही रुग्णालये केवळ शोभेची बनली आहेत. तेथे वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. 

आतापर्यंत चार आयुक्त झाले, तरीही उपकरणांची खरेदी होऊ शकली नाही. महापालिकेने उपकरणांच्या खरेदी करण्याचा प्रयत्न करताच काही कंत्राटदार स्वयंम घोषित सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून चुकीचे व दिशाभूल करणारे आरोप प्रशासनावर करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे उपकरणांची खरेदी सतत लांबणीवर पडत आहे. विशेष म्हणजे, विद्यमान आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी ही उपकरणे खरेदी करण्याच्या निविदेमध्ये जातीने लक्ष घालून प्रक्रिया पार पाडली आहे. याशिवाय निविदापूर्व बैठकीत निविदाकारांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्नही केला आहे. ही रुग्णालये लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी रामास्वामी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाच्या कामकाजावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तीन महिन्यांत रुग्णालयांना सर्व उपकरणे मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. 

उपकरणांची खरेदी झाल्यानंतर मनुष्यबळ देण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार नोव्हेंबर-२०१७ मध्ये झालेल्या स्थायी समितीमध्ये ३० उपकरणांच्या खरेदीला मान्यता मिळाली आहे. यात व्हेंटिलेटर, ऑपरेशन टेबल, निर्जंतुकीकरण विभागातील उपकरणे, दंत विभागासाठी उपकरणे आदींचा समावेश आहे. त्यामुळे उशिरा का होईना; पण रुग्णालयांत उपकरणे येण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित उपकरणांसाठी फेरनिविदा मागवली असून, ती लवकरच मिळण्याची शक्‍यता आहे. हे सर्व होत असताना ज्या कंपन्यांना टेंडर मिळाले नाही ते काही सामाजिक कार्यकत्यांना व इतरांना पुढे करून या निविदा प्रक्रियेवर वारंवार खोटे आरोप करताहेत आणि कामात अडथळा आणून महापालिकेची बदनामी करीत आहेत. यातील काही स्वार्थी कंपन्यांमार्फत सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे.

उपकरणांअभावी विभाग बंद
महापालिकेच्या रुग्णालयात सध्या नस्थेशिया मशीनची गरज आहे; मात्र मशीन व आयसीयू मॉनिटर नसल्याने ऑपरेशन होत नाहीत. रक्तपेढी व प्रयोगशाळेत उपकरणे नसल्याने रक्ताची चाचणी करता येत नाही. कान, नाक, घसा व डोळे या विभागाची उपकरणे, शस्त्रक्रिया विभागाची उपकरणे, फिजिओथेरपी विभागात उपकरणे नसल्याने हे विभाग बंद आहेत. सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप प्रशासनावर होत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा ताकही फुंकून पित आहे.

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन
उपकरणे खरेदी निविदेत नमूद केलेली प्री-क्वॉलिफिकेशन क्रायटेरिया ही अट सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच असून, याबाबत महापालिकेने राज्य सरकारला यापूर्वी अनेकदा कळवले आहे. यामध्ये एक बाब विशेष आहे की, महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवर आरोप करणाऱ्या कंपन्यांमध्ये एमआरपीपेक्षा जास्त दराने महापालिकेस साहित्यपुरवठा करून महापालिकेचे नुकसान करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. सध्या उपकरणांची खरेदी ४२ कोटींची आहे. त्यासाठी १५ कोटींचे कंत्राट दिले आहे. या हॉस्पिटल्सची सहा वर्षांतील पहिलीच खरेदी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com