जव्हार नगरपरिषदेचे मतदान लांबल्याने प्रचार थंडावला

Jawhar-ZP
Jawhar-ZP

मोखाडा : जव्हार नगरपरिषद निवडणूकीच्या मतदानाची तारीख चार दिवस वाढली आहे. मतदान 13 ऐवजी 17 डिसेंबरला होणार असल्याने प्रचार थंडावला आहे. प्रचार फेर्‍या, गृहभेटीचा वेगही मंदावला आहे. कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांमध्ये मरगळ आल्याचे दिसत आहे. नेत्यांच्या प्रचार सभाही रद्द कराव्या लागल्या आहेत. आता नव्याने रणनीती, अंदाज आडाखे बांधण्याच्या कामाला नेते व कार्यकर्ते लागले आहेत. 
जव्हार नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होत आहे. तर 17 जागांसाठी 66 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान 13 डिसेंबरला होणार होते. मात्र, हरकती व न्याय प्रविष्ट बाबींमुळे जिल्हयातील तीनही निवडणूकांची तारीख चार दिवस पुढे ढकलून 17 डिसेंबरला घेण्याचा निर्णय निवडणूक आयुक्त ज. स. सहारीया यांनी घेतला. या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांची रणनीती कोलमडली आहे. 

प्रचाराची रणधुमाळी थंडावली आहे. शहरात रोज होणार्‍या, मतदारांच्या गृहभेटी, निघणाऱ्या प्रचार फेऱ्यांचा वेग मंदावला आहे. ऊमेदवार, नेते आणि कार्यकर्ते यांच्यात मरगळ आल्याचे स्पष्ट दिसत आहे. सर्व रणनीती कोलमडल्याने नव्या दमाने प्रचारयंत्रणा राबवण्याच्या तयारीला नेते व कार्यकर्ते लागले आहेत. दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनापूर्वी शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सभेचे आयोजन 9   डिसेंबरला केले होते. मात्र, त्याच दिवशी मतदानाची तारीख पुढे चार दिवस ढकलल्याचे आदेश आल्याने ही सभाही, शिवसेनेला रद्द करावी लागली. आता नव्या रणनीतीची शिवसेनेने तयारी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने पहीली प्रचार सभा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आयोजित केली होती. तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा घेऊन प्रचारात रंगत आणली होती. मात्र, मतदानाची तारीख पुढे ढकलल्याने दोन्ही पक्षांची रणनीती कोलमडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com