कल्याणमधील काँक्रिटचे रस्ते पुन्हा वादात

सुचिता करमरकर
बुधवार, 21 जून 2017

कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांना तडे गेल्याची बाब कल्याण डोंबिवली पालिकेत नवीन नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या या कामांबाबत शंका उपस्थित केली गेली आहे. या रस्त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

कल्याण - कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांना तडे गेल्याची बाब कल्याण डोंबिवली पालिकेत नवीन नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या या कामांबाबत शंका उपस्थित केली गेली आहे. या रस्त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

काँग्रेस सरकारच्या 2011-2012 सालादरम्यान महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 374 कोटी रुपये खर्च करून काँक्रीटचे रस्ते तयार करण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. गेल्याच पाच वर्षांपासून ही कामे सुरु आहेत. मात्र या रस्त्यांच्या दर्जाबाबत कायमच साशंकता राहिली आहे. पहिल्या टप्प्यातील कामातही रस्त्यांना महिन्याभरात तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. सध्या कल्याण पश्‍चिमेमधील संतोषी माता मंदिर रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर असतानाच तिथे छोटे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी काँक्रीट रस्त्याचा वरचा भागही निघाला आहे. डोंबिवलीमधेही असा प्रकार उघडकीस आला आहे. मनसेने या कामांच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला असून रस्त्यांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे गटनेते प्रकाश भोईर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. काम करणारा ठेकेदार तसेच सत्ताधारी सेना भाजपा यांचे साटंलोटं असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. संतोषी माता मंदिर रोडचे काम लॅंडमार्क कॉर्पोरेशन प्रा लि ही कंपनी करत आहे. या कामी पालिकेने 43.11 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

यापूर्वी काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामांचे मुल्यमापन करण्यासाठी पालिकेने व्ही जे टी आय त्याला तज्ज्ञांना पाचारण केले होते. या ऑडिटच्या अहवालात शहरात तयार होत असलेल्या रस्त्यांचा दर्जा, त्यावर पडलेले तडे त्याची कारणे तसेच त्यावर उपाय अशी सर्व माहिती आहे. त्यानुसार रस्त्यांची कामे केली जात असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली आहे. दरम्यान ही कामे सुरु असताना, काँक्रीट ओले असताना काही ठिकाणी नागरिकांकडूनही रस्त्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते खराब झाल्याचे मान्य करण्यात आले. या रस्त्यांच्या कामांची देखरेख ठेकेदार, पालिका अधिकारी, पालिकेने नेमलेल्या ध्रुव कन्सलटंटचे तज्ज्ञ तसेच व्ही जे टी आयचे ऑडीट या माध्यमातून केली जाते.