डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे राष्ट्रनिर्माते : प्रा. आनंद देवडेकर 

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

''आधुनिक भारतीय राजकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला इतके महत्त्व आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा पूर्ण होत नाही''

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभ्यासक संशोधकांकडून उपलब्ध होणाऱ्या नवनव्या माहितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. हे आता सिद्ध होत आहे, असे प्रतिपादन,सद्धम्म पत्रिकेचे संपादक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष  प्रा. आनंद देवडेकर यांनी केले.  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चेतना महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रा. देवडेकर बोतत होते. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण  भाषणात  बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत काही नवे पैलू उलगडून दाखविले. या कार्यक्रमात बोलताना निवृत्त प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील म्हणाले, ''आधुनिक भारतीय राजकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला इतके महत्त्व आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा पूर्ण होत नाही''. 

चेतना महाविद्यालयतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या कार्याची प्रशंसा करून डॉ. पाटील पुढे म्हणाले की, अध्यासनाने आता आपल्या  कार्यक्रमात राष्ट्रनिर्मातीच्या सप्तपदीचाही अंतर्भाव करावा.

यावेळी 'अध्यासन पत्रिका' या अध्यासनाच्या मुखपत्राचे प्रकाशन डॉ. एस. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य गिरीश साळवे, पर्यवेक्षक प्रा. हेमंत कांबळे, प्रा. गजानन डोंगरे, प्रा. कैलाश लांडगे आदींनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डोंगरे यांनी केले.

Web Title: marathi news local mumbai Dr. Babasaheb Ambedkar was real nation creator anand devdekar