प्लॅस्टिक कचरा मोहिमेस अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद

सुचिता करमरकर
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

शालेय विद्यार्थ्यांनी किती कचरा जमा केला यापेक्षा त्यांचा यातील सहभाग तसेच त्यांच्यात जागृती निर्माण करणे ही या मोहिमेमागील भूमिका आहे. यापुढील काळात पालिका ज्या योजना राबवेल त्यासाठीची ही पहिली पायरी आहे. 
- राजेंद्र देवळेकर, महापौर

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्वच्छता मोहिमेतील एक भाग म्हणून आज पालिका क्षेत्रातील शाळांमधून प्लॅस्टिक कचरा तसेच ई कचरा गोळा करण्यात आला. संध्याकाळी उशीरापर्यंत या मोहिमेतून साधारण पाचशे ते सहाशे किलो कचरा जमा झाला. पालिकेने तसेच महापौर राजेंद्र देवळेकर यांनी यासाठी केलेल्या आवाहनाला सुमार प्रतिसाद मिळाल्याचे म्हणावे लागेल. 

मागील पंधरा दिवसांपासून पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापौर राजेंद्र देवळेकर तसेच मध्यवर्ती शहर स्वच्छता समितीने शालेय शिक्षक, प्राचार्य यांच्याशी संवाद साधून प्लॅस्टिक कचरा जमा करण्याची मोहिम राबवली आहे. या मोहिमेतील विद्यार्थी सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले केले. मात्र आज जमा झालेला कचरा अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्यांच्या या प्रयत्नांना नागरिकांची साथ लाभली नाही असे खेदाने म्हणावे लागेल. या मोहिमेतून साधारणपणे हजार ते बाराशे किलो कचरा जमा होईल अशी अपेक्षा होती. आजच्या मोहिमेत पालिका परिसरातील 110 शाळा सहभागी झाल्या होत्या. काही शाळा मांगीलाल अनेक दिवसांपासून हा उपक्रम नियमितपणे राबवत आहेत तर यापुढे अन्य काही शाळा अशा उपक्रमात सहभागी होती अशी अपेक्षा आहे. 

पालिका प्रशासनानेही पंधरा जुलैपासून प्लॅस्टिक बंदीवर कारवाई करताना सुरुवातीला कडक भूमिका घेतली होती. दंडात्मक कारवाईसह गांधीगिरी करत पालिकेने व्यापारी वर्गालाही प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते. फेरीवाल्यांवरही अशाच प्रकारची कारवाई झाली. मात्र ही कारवाई शहरातील सर्व भागात सरसकट न झाल्याने काही भागात आजही फेरीवाले, भाजी विक्रेते सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसतात. पालिकेकडे या मोहिमेच्या कडक अंमलबजावणीसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचेही स्पष्ट होत आहे. पालिकेने पुढाकार घेत ही प्लॅस्टिक बंदी लागू केली असली तरी नागरिकांच्या सहभागाशिवाय त्याला यश मिळणार नाही हे नक्की.

Web Title: marathi news marathi website Kalyan News Mumbai News Plastic free Kalyan