'नो पार्किंग'मध्ये रिक्षा उभी करणाऱ्या चालकाने पोलिसालाच केली मारहाण! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

कल्याण : 'नो पार्किंग'मध्ये रिक्षा उभी करून खरेदीसाठी गेलेल्या रिक्षा चालकाला वाहतूक पोलिसाने दंड भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या चालकाने त्या पोलिसालाच धक्काबुक्की केली. ही घटना काल (गुरुवार) दुपारी घडली; मात्र या घटनेचा व्हिडिओ आज (शुक्रवार) सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या त्या रिक्षा चालकास बाजार पेठ पोलिसांनी अटक केली आहे. 

कल्याण वाहतूक शाखेतून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या पश्‍चिम भागात मोहिंदर काबुलसिंग चौकात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. 'नो पार्किंग'मध्ये उभी असलेली रिक्षा या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरली होती. बराच वेळ वाट पाहूनही रिक्षा चालक न आल्याने वाहतूक शाखेचे पोलिस नाईक नामदेव हिमगिरे यांनी रिक्षामधील मागील सीट काढून घेतले. काही वेळाने रिक्षा चालक राहुल कारंडे घटनास्थळी आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. 

यानंतर पोलिस आणि कारंडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. कारंडेने 200 रुपये पोलिसांच्या तोंडावर फेकत दंडाची पावतीही फाडून टाकली. त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाणही केली. या घटनेमुळे रिक्षा चालकांच्या दादागिरीची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. 

'पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही' हे यापूर्वीच स्पष्ट केले होते. कालच्या घटनेमध्ये संबंधित रिक्षा चालक 'नो पार्किंग'मध्ये रिक्षा उभी करून खरेदीसाठी निघून गेला. त्या परिसरामध्ये शाळा असल्याने दुपारच्या वेळेत तिथे वाहनांची रांग लागली. रिक्षा चालक आल्यानंतर त्याला दंड भरण्यास सांगितल्यावर ही घटना घडली. त्या आरोपीला अटक केली आहे. रिक्षा चालकांनी शिस्त पाळावी. कायदा हातात घेतला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल', अशी प्रतिक्रिया कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी 'सकाळ'ला दिली.