कल्याणमध्ये स्कायवॉकवरील फेरीवाल्यांविरोधात कारवाई 

रविंद्र खरात
गुरुवार, 20 जुलै 2017

कल्याण रेल्वे स्थानकामध्ये जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी स्कायवॉक बांधण्यात आला होता. मात्र, बेकायदेशीर फेरीवाल्यांनी यावर आपले बस्तान बसविल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.

कल्याण : कल्याणमधील पश्‍चिम रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर बेकायदा बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा दल, पालिका आणि पोलिसांनी आज (गुरुवार) धडक कारवाई करत त्यांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या 15 फेरीवाल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. 

कल्याण रेल्वे स्थानकामध्ये जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी स्कायवॉक बांधण्यात आला होता. मात्र, बेकायदेशीर फेरीवाल्यांनी यावर आपले बस्तान बसविल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीमुळे पालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या आदेशानुसार पालिकेच्या 'क' प्रभाग क्षेत्राचे अधिकारी विनय कुलकर्णी आणि महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोवार व कल्याण रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने आज दुपारी तीननंतर फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली. 

अचानक कारवाई सुरू झाल्याने फेरीवाल्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. अनेकजणांचा माल पालिकेने जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान 15 फेरीवाल्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

हक्कभंग आणणारच..! 
'स्कायवॉक फेरीवाला मुक्त व्हावा' यासाठी भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी काही महिन्यांपूर्वी येथे पाहणी केली होती. 'अधिकाऱ्यांविरोधात पावसाळी अधिवेशनामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणू' असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतरही स्कायवॉकवर फेरीवाले बसत होते. पवार यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांची भेट घेऊन हक्कभंग प्रस्ताव आणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर सूत्रे हालली. मात्र, या कारवाईमध्ये सातत्य असले पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. येत्या 24 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचा पुनरुच्चारही आमदार पवार यांनी केला.