टंकलेखनाची टकटक बंद होणार! 

टंकलेखनाची टकटक बंद होणार! 

वडाळा : इंग्रजांच्या काळात सुरू झालेले टाईपरायटर अर्थात टंकलेखन यंत्र सध्याच्या डिजिटल युगात कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अनेक वर्षांपासून टंकलेखनाची परीक्षा घेतली जाते. शनिवारी (ता. 12) अनेक ठिकाणच्या केंद्रांवर अखेरची परीक्षा झाली. मुंबईतील सात विविध इन्स्टिट्यूटमधील 719 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, अशी माहिती दक्षिण मुंबईतील परळ भोईवाडा येथील नवभारत विद्यालयातील परीक्षा केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक बकाराम वळवी यांनी दिली. 

दहावी, बारावीनंतर अनेक विद्यार्थी टंकलेखनाचे प्रशिक्षण घेतात. इतर शिक्षणासह टंकलेखनाचे प्रमाणपत्र म्हणजे नोकरी मिळवण्यासाठीचे एक महत्त्वाचे प्रमाणपत्र मानले जात असे. हलाखीच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नसणारे अनेक विद्यार्थी टंकलेखनाचे प्रशिक्षण घेऊन लिपिकपदावर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असत; मात्र संगणकाच्या युगात टंकलेखन अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. टंकलेखन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र क्रमप्राप्त झाले होते. त्यामुळे सरकारने मॅन्युअल टायपिंग यंत्रे आणि संगणकाचा योग्य समन्वय साधून संगणक टायपिंग कोर्स अधिकृत टायपिंग संस्थांमध्ये लागू केला; परंतु संगणकीय यंत्रणांचा वाढता वापर पाहता टंकलेखन मागे पडू लागले. त्यातच सध्याचा डिजिटलचा वाढता प्रभाव टाईपरायटरची टकटक बंद करणारा ठरला आहे. 

परळ पूर्व भोईवाडा येथील नवभारत विद्यालयातील केंद्रावर गेल्या सहा दिवसांत विविध ठिकाणच्या सात इन्स्टिट्यूटमधील 719 परीक्षार्थींनी टंकलेखनाची अखेरची परीक्षा दिली. यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील परीक्षार्थींचा समावेश होता, अशी माहिती पर्यवेक्षक शिवाजी हिरवे यांनी सांगितली. 

ग्रामीण भागात गरजच 
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. अशा स्थितीत टंकलेखन यंत्रांचा वापर सोईचा ठरतो. त्यामुळे ग्रामीण भागात टंकलेखनाची गरज जाणवेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com