नितीशकुमारांच्या होकारानंतरच कोविंद यांचे नाव निश्‍चित? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेली शिवसेना ऐनवेळी राष्ट्रपती निवडणुकीत साथ देईल की नाही, याची खात्री भाजपला वाटत नव्हती. यावर भाजपत मंथन सुरू असतानाच जनता दल युनायटेड पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा निश्‍चित केल्यानंतरच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांचे नाव निश्‍चित केल्याचे सांगितले जाते. 

कोविंद यांनी भाजप आणि घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी आज मुंबईत संवाद साधला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार निश्‍चितपणे निवडून येण्यासाठी 25 हजार मते कमी पडत होती. त्यातच भाजपचा एकेकाळचा सर्वांत जुना मित्र आणि सध्याचा केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा भागीदार शिवसेना पक्ष विरोधात गेला तर 50 हजार मतांची बेगमी करण्याचे आव्हान भाजप श्रेष्ठींकडे होते.

यापूर्वी शिवसेनेने प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देताना भाजपच्या भूमिकेला छेद दिला होता. त्यामुळे एनडीएमधील घटक पक्षांबरोबर इतर पक्षांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत होते. त्यामुळे शहा यांनी नितीशकुमार यांच्याकडून शब्द घेतला होता, असे सांगण्यात येते. 

कोविंद हे बिहारचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्यामुळे नितीशकुमार यांच्याबरोबर त्यांचे पटणारे होते. कोविंद यांना नितीशकुमार नक्‍कीच पाठिंबा देतील, याची अटकळ भाजपत बांधली गेली. यानंतर प्रत्यक्ष विचारणा झाल्यानंतर नितीशकुमारांनीही आढेवेढे घेतले नाहीत. नितीशकुमारांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडीलाही झटका बसला आहे.