रेल्वेच्या हद्दीतील रस्ते दुरुस्त करा; कल्याणमध्ये मागणी 

रविंद्र खरात
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

कल्याण : कल्याण पश्‍चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रेल्वे हद्दीतील अंतर्गत वाहतूक करणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून हे रस्ते तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी रिक्षा-टॅक्‍सी चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. 

कल्याण रेल्वे स्थानकातून लोकल आणि मेल गाडीने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. कल्याण रेल्वे स्थानकात 24 तास प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याणच्या पश्‍चिम स्थानकावर होम फलाटाजवळ, जुन्या कोर्टाजवळ, तिकिट खिडकीसमोर आणि रेल्वे पोलिस ठाण्यासमोर रिक्षा-टॅक्‍सी स्टॅंड सुरू करण्यात आला. येथून कल्याण पूर्व व पश्‍चिमच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रिक्षा व उल्हासनगर, भिवंडीसह मुंबई, नवी मुंबई, पुणे मार्गावर धावणाऱ्या टॅक्‍सींचे स्टॅंड आहेत. 

या परिसरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण केले होते; पण अंतगर्त रस्त्यांची डागडुजी न केल्याने रेल्वे स्थानकाच्या परिसरात येणाऱ्या वाहन चालकांना त्रास होत आहे. 'वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. या रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा', अशी मागणी पेणकर यांनी केली. 

Web Title: marathi news marathi websites Kalyan News Mumbai News Kalyan Railway Station