फेरीवाल्यांचा वाद चिघळला; मालाडला मनसे-फेरीवाले भिडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

मुंबई : मनसेच्या फेरीवाला विरोधातील आंदोलनाला काँग्रेसने आव्हान दिल्यामुळे त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. फेरीवाल्यांना कायदा हातात घेण्याचा सल्ला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शनिवारी (ता.28) दिल्यानंतर मालाड येथे फेरीवाल्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप मनसेने केला आहे.

त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मालाडला मनसेचे कार्यकर्ते आणि फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मारहाणप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले. संध्याकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे हा राजकीय संघर्ष विकोपाला जाणार आहे. 

रेल्वेस्थानकांच्या परिसरातील फेरीवाले हटत नसल्याने मनसेने रस्त्यावर उतरून स्वत: फेरीवाले हटविण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांना मारहाण केली. या पार्श्‍वभूमीवर आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मालाडमधील फेरीवाल्यांची भेट घेतली. त्यावेळी 'मनसेचे गुंड मारहाण करत असताना पोलिस संरक्षण देत नसतील तर कायदा हातात घ्यावा लागेल', असे विधान निरुपम यांनी केले. त्यानंतर मनसेचे मालाड येथील विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना रेल्वेस्थानकाच्या परिसरातील फेरीवाल्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. 

यानंतर इतर ठिकाणचे मनसे कार्यकर्ते मालाडला गेले. त्यावेळी रेल्वेस्थानकाच्या परिसरातील फेरीवाल्यांशी त्यांची बाचाबाची झाली. पोलिसांनी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे मालाडमध्ये रात्री उशिरापर्यंत तणाव होता. 

राज ठाकरे रविवारी भेटणार 
मालाड येथील जान्हवी नर्सिंग होममध्ये दाखल असलेल्या माळवदे यांना भेटण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणार होते. मात्र, वैद्यकीय कारणास्तव ते जाऊ शकले नाहीत. ते उद्या माळवदे यांची भेट घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गरीब फेरीवाल्यांना मनसेचे गुंड त्रास देत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा. फेरीवाल्यांना पोलिस संरक्षण मिळाले नाही तर ते कायदा हातात घेतील. मग कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल. 
-संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस. 

संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. त्याचे पडसाद निरुपम यांच्यासह सर्वांनाच भोगावे लागतील. 
- संदीप देशपांडे, प्रवक्ते, मनसे.