शिवसेनेला 'ना निरोप, ना विचारणा'...! 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 सप्टेंबर 2017

निवडणूक प्रचारात पंतप्रधान आवास योजनेच्या घोषणा केल्या. गरिबांना मोफत घरांचे आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही. अशा लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा धोकादायक इमारतींमधील कुटुंबांची तातडीने पर्यायी व्यवस्था करा. 
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना भारतीय जनता पक्षाने सत्तेतला मित्रपक्ष शिवसेनेला पूर्णत: बगल दिली आहे. राजकीयदृष्ट्या या महत्त्वाच्या क्षणी शिवसेनेला विचारात घेतले तर नाहीच; पण साधे निमंत्रणदेखील दिले नसल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भाजपने संपर्क साधला नसून आपणदेखील भाजपकडून कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही अथवा मागणी केलेली नाही, असे ठाकरे म्हणाले. 

सध्या सगळेच मंत्रिमंडळ विस्तारात मग्न असले, तरी शिवसेनेला मात्र पुरातून सावरलेल्या मुंबईकरांच्या आरोग्याची चिंता आहे. मुंबईत रोगराई पसरू नये म्हणून शिवसैनिक काळजी घेत आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या (रविवारी) सकाळी 10:30 वाजता विस्तार होणार आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमातूनच कळाल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजप खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत सगळे खासदार दहशतीखाली असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा दाखला देत, सध्या आम्ही या दहशतीखाली राहायचे की कसे, याबाबत गोंधळ उडाल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 

मुंबईतील पूरस्थितीमुळे भाजपने शिवसेनेच्या विरोधात टोकाची मोहीम छेडली आहे. शिवसेना व मुंबई महापालिकेला भाजपने लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव म्हणाले, की भेंडीबाजार इमारत दुर्घटना झाली. मात्र एवढ्या इमारती धोकादायक आहेत, एवढ्या इमारतींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यापलीकडे सरकारच्या गृहनिर्माण धोरणाची मजल जात नाही.