कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी 'मेकोरोट' या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. 

मुंबई - आज मुख्यमंत्री सचिवालय येथे जनसंपर्क कक्षात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेतले गेले. ज्यात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी - 2017 ला मान्यता देण्यात आली. तर मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी 'मेकोरोट' या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यास मान्यता मिळाली आहे. 

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कोल्हापूर येथील विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर’ असे करण्यात येणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (मिहान) चे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल-संचलन आदी कामे पीपीपी तसेच डीबीएफओटी तत्त्वावर करण्यासाठी प्रस्ताव मागविले जाणार आहेत. सिडको महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी साडेबावीस टक्के विकसित भूखंडाची योजना मंजूर झाली आहे. लवकरच ग्रामपंचायतींच्या स्वत:च्या कार्यालयासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरु करण्यात येईल. नागरी जमीन कमाल धारणा कलमानुसार औद्योगिक प्रयोजनासाठी सवलत देण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतर शुल्काच्या आकारणीबाबत निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. अनाथ मुलांच्या उन्नतीचा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतो. परंतू आता अनाथ मुलांच्या सामाजिक - आर्थिक उन्नतीसाठी 1 टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला.

याशिवाय काही सुधारणा या बैठकीत करण्यात आला. सरपंचांच्या थेट निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम - 1958 च्या काही कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली. तर भूसंपादन अधिनियम - 2013 मध्ये आणि महामंडळाच्या सदस्य संख्या वाढीसाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम - 2000 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झाला आहे. 
 

Web Title: marathi news ministry meeting mumbai decisions