सांस्कृतिक कार्यक्रमांना क्रॉस मैदानावर मनाई

File photo of Kala Ghoda Festival in Mumbai
File photo of Kala Ghoda Festival in Mumbai

मुंबई : उद्यापासून सुरू होणाऱ्या काळा-घोडा महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी क्रॉस मैदानाचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज सोमवारपर्यंत (ता. 5) मनाई केली. राज्य सरकारने आयोजकांना फुकट कार्यक्रमाची परवानगी दिलीच कशी, असा सवालही न्यायालयाने केला. 

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मैदानांवर सांस्कृतिक कार्यक्रमांना विनाशुल्क परवानगी देताना नियमांची आखणी करणे गरजेचे आहे, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले. दक्षिण मुंबई शांतता क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे काळा-घोडा महोत्सवातील काही कार्यक्रम क्रॉस मैदानावर होतात. यासाठी आयोजकांना दरवर्षी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.

यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजकांना थेट परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी मोघम आहे. नक्की कोणत्या कारणासाठी प्रशासन परवानगी देत आहे, याचा कोठेही आढावा घेतलेला नाही, अशी खरमरीत टीका न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने केली. किमान हा कार्यक्रम सामाजिक आहे की व्यावसायिक, याची तरी माहिती घ्यायला हवी होती आणि त्यानुसार परवानगीची प्रक्रिया राबवायला हवी होती, असेही खंडपीठ म्हणाले.

क्रॉस मैदानावर खेळाचे कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. उद्या क्रॉस मैदानावर तबलावादक झाकिर हुसेन यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परवानगी द्यावी, अशी मागणी आयोजकांतर्फे करण्यात आली. या मागणीलाही न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी (ता. 5) होणार आहे. 

आयोजकांना सुनावले 
आयोजकांना मिळालेली सरकारी परवानगी अत्यंत मोघम आणि अपूर्ण आहे, अशा परिस्थितीत न्यायालय कार्यक्रमांना परवानगी देणार नाही. राज्य सरकार, प्रशासन आणि न्यायालय तातडीने परवानगी देतील, अशा भ्रमात आयोजकांनी राहू नये, असेही न्यायालयाने सुनावले. सोमवारपर्यंत नव्याने सविस्तर परवानगीबाबत निर्णय देऊ, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com