'हाईट बॅरिअर' योजनेचा पहिल्याच दिवशी बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

'हाईट बॅरिअर' योजना अमलात आणताना निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात आला नाही. योजना सुरू करण्यापूर्वी याबाबत जागृती केली नाही. परिणामी, पहिल्याच दिवशी ही योजना कुचकामी ठरली. यात झालेल्या आर्थिक खर्चाला जबाबदार कोण, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 
- दत्ताजी मसुरकर, माजी नगराध्यक्ष- खोपोली

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात व वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्या लेनवर एकूण 56 ठिकाणी 'हाईट बॅरिअर' बसविण्यात आले होते. याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 22) उद्‌घाटन करण्यात आले; मात्र बेशिस्त वाहनचालकांनी अनेक बॅरिअर पहिल्याच दिवशी वाहनांच्या धडकेने तोडले. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड वाहतूक विभागाला बसला आहे. 

दरम्यान, वाहतूक विभागाकडून तुटलेल्या हाईट बॅरिअरची तातडीने दुरुस्ती करण्यात येत आहे; मात्र कोणताही तांत्रिक अभ्यास न करता अमलात आणलेल्या या योजनेच्या उपयुक्ततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. या योजनेसाठी करण्यात आलेला आर्थिक खर्च आणि भविष्यात दुरुस्तीसाठी होणारा लाखोंचा खर्च कुचकामी ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

योजनेनुसार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या एकूण 94 कि.मी. अंतरात प्रत्येक 300 मीटर अंतरावर हे 'हाईट बॅरिअर' उभारण्यात आले आहेत. महामार्गावरच्या पहिल्या लेनमधून फक्त कार व त्या स्वरूपाच्या वाहनांनाच प्रवास करता येईल अशी ही योजना आहे; मात्र पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारीच रात्री नियम तोडून मोठ्या वाहनांनी अनेक हाईट बॅरिअर तोडले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यावर महामार्ग पोलिसांनी शुक्रवारी तातडीने हे हाईट बॅरिअर दुरुस्त करून उभे केले; मात्र योजना अमलात आणताना वाहतूक विभागाने विविध अडचणी, तांत्रिक बाबी आणि होणारा खर्च याचा अभ्यास केला नसल्याचे स्पष्ट झाल्याने याबाबत अनेकांनी टीका केली आहे. 

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी पहिल्या लेनमधून फक्त कारसारख्या छोट्या वाहनांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी 'हाईट बॅरिअर' योजना सुरू केली. उभारलेल्या या काही हाईट बॅरिअरला फटका अंधारात वाहनांचा बसल्याने काही ठिकाणी ते तुटले आहेत; मात्र त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली आहे. भविष्यात असा प्रकार होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस यंत्रणा लक्ष देत आहे. 
- अमोल तांबे, वाहतूक पोलिस निरीक्षक महामार्ग