शिवसेना, काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू

शिवसेना, काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू

नवी मुंबई - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना व काँग्रेसमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामुळे काही वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हाप्रमुखपदी दोघांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे शहराला चक्क दोन जिल्हाप्रमुख मिळणार आहेत. नाराजांचे मन वळवण्यासाठी अक्षरश- पदांची खैरात वाटली जाणार आहे. काँग्रेसमध्येही पक्षप्रतोदपदी माजी उपमहापौर अविनाश लाड यांची नियुक्ती केली आहे.

महापालिका निवडणुकीतील पराभवातूनही अद्याप शिवसेनेच्या नेत्यांनी धडा घेतल्याचे दिसत नाही. उपनेते विजय नाहटा व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यात असलेल्या वादामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेतील याच वादामुळे अनेक वर्षांपासून नवी मुंबईसारख्या परिसरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद रिक्त आहे; परंतु आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. यात उपनेते विजय नाहटा व बेलापूर मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे आघाडीवर आहेत. नवी मुंबईत आता उत्तर व दक्षिण असे शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख असणार आहेत. उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व कार्यालयप्रमुख अशी पदांची खैरात शिवसैनिकांवर करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पदे देऊन महापालिका निवडणुकीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जाणार आहे. याच नाराजांमुळे शिवसेनेला महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नव्हते; परंतु शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी धडपडणाऱ्यांना पदे देण्यावरून चौगुले गटातून नाराजी उफाळण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या पदवाटपातून चौगुले गटाने लांब राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. दुसरीकडे काँग्रेसनेही आता जिल्हाध्यक्ष बदलानंतर महापालिकेतील पक्षाचा गटनेता बदलला आहे.

ओबीसी चेहरा
नगरसेविका अंजली वाळुंज यांना दिलेला कार्यकाळ संपत आल्याने त्यांच्या जागी माजी उपमहापौर अविनाश लाड यांची निवड झाली आहे. अनेक वर्षे नगरसेवक असलेल्या लाड यांचा नवी मुंबईत दांडगा जनसंपर्क आहे. नवी मुंबईत ओबीसी मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ओबीसी चेहऱ्याचा काँग्रेसला फायदा होईल. पक्षप्रतोदपदासाठीही काँग्रेसमध्ये जोरदार चुरस झाली होती. पक्षप्रतोद म्हणून नवी मुंबईतील स्थानिक आगरी समाजाच्या नेत्याकडेच हे पद राहावे यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींची मनधरणी सुरू होती; मात्र ऐनवेळी संबंधितांनी उचल खाल्ल्यामुळे लाड यांच्या पदरात चव्हाणांनी पक्षप्रतोदाचे पद टाकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com