घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद

 घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद

ठाणे - हलक्‍या दर्जाचा गणवेश तसेच कोणतीही आगाऊ उचल कर्मचाऱ्यांनी घेतलेली नसतानाही वेतनात कपात केली जात असल्याने, संतापलेल्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन केले. यामुळे वर्तकनगर, रायलादेवी आणि मानपाडा प्रभाग समिती विभागातील कचरा दिवसभरात उचलला गेला नाही. सकाळ आणि दुपारच्या सत्रातील सुमारे २०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. चांगल्या दर्जाचा गणवेश आणि वेतनातील अन्याय दूर झाला नाही, तर सर्व शहरातील घंटागाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा या वेळी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे नेते महेंद्र हिवराळे यांनी दिला. 

ठाणे महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या अ गट घंटागाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्‍न प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यासाठी पालिकेने संबंधित ठेकेदाराला निधी दिला आहे; परंतु ठेकेदाराने हलक्‍या दर्जाचे गणवेश कर्मचाऱ्यांना पुरविले आहेत. याविषयी कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देत गणवेश दाखवले. 

अधिकाऱ्यांनी कंत्राटदारासोबत चर्चा करू, असे केवळ आश्‍वासन दिले; परंतु त्याचे आतापर्यंत काहीही झाले नाही. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांनी कोणतीही उचल घेतलेली नसतानाही त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कापली जात होती. गेल्या महिन्यात या संदर्भात संघटनेने पत्रव्यवहारही केला होता. त्याकडे दुर्लक्ष करून या महिन्यात २१ तारखेला वेतन अदा करून त्यातून ठराविक रक्कम कापण्यात आल्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन केले. 

आंदोलन तीव्र  करण्याचा इशारा
कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे वर्तकनगर, रायलादेवी आणि मानपाडा या भागांतील कचरा उचलण्यात आला नाही. दुपारच्या सत्रात कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांनाही या आंदोलनाची माहिती मिळताच तेही आंदोलनात सहभागी झाले. यामुळे या परिसरातील दुपारच्या वेळेतही कचरा उचलला गेला नाही. पालिकेचे अधिकारी व ठेकेदाराने आमच्यासोबत चर्चा करून आमच्या मागणीकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा शुक्रवारपासून हे आंदोलन तीव्र स्वरुपात करण्यात येईल; असे कर्मचारी प्रमोद शाहू यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com