ठाणे: अंबाडी नाक्‍यावर 8 लाखाची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

दमन येथून मोटारीतून उल्हासनगर येथे विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या तब्बल 8 लाख 63 हजार 770 रुपयांची दमण येथील दारु पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

वज्रेश्वरी (जि. ठाणे) - दमन येथून मोटारीतून उल्हासनगर येथे विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या तब्बल 8 लाख 63 हजार 770 रुपयांची दमण येथील दारु पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.

गणेशपुरी पोलिस ठाणे हद्दीत पोलिस कर्मचारी अंबाडी नाक्‍यावर अंबाडी पूलाखाली नाकाबंदी करीत होते. त्यावेळी एका इनोव्हा मोटारीतून 8 लाख 63 हजार रुपयांच्या दमणची दारुची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी कारवाई करत ही दारु जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी भूषण दत्तात्रय भंडारी (वय 23, रा. अंबरनाथ पूर्व), अजय राजकुमार माकीजा (वय 28, रा. उल्हासनगर), दिनेश हेमनदास दोडेजा (वय 29, रा. उल्हासनगर) या तीन आरोपींना अटक केले आहे. सदर दारूचे बॉक्‍स हे दमनहून उल्हासनगर येथे विक्रीसाठी नेण्यात येत होते.

गणेशपुरी हद्दीतून दमणची चोरटी दारूची वाहतूक होत असल्याची पक्की खबर पोलिसांना खबऱ्यांकडून काही दिवसापूर्वी मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक थाटकर, पो. ना. म्हस्के चारसकर, पो. सी. योगेश पाटील यांनी अंबाडी नाक्‍यावर नाकाबंदी करून एका MH04 CG 2567 या क्रमांकाची इनोव्हा मोटारीमधून विदेशी बनावटीची बॅन्डर्स स्प्राईडच बॉक्‍स, रॉयल चोलेंज दोन बॉक्‍स, रॉयल स्ट्रॉंगचे सात बॉक्‍स, डी.एस.पी. ब्लॅक विदेशी दारूचे चार बॉक्‍स तसेच सिग्नेचर रेड ब्लॅक असे एकूण 8 लाख 63 हजार 779 रुपयाची विदेशी दारू जप्त केली आहे. याविषयी गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.