प्लॅस्टिकमुक्त ठाण्याचा संकल्प; प्रभागनिहाय दक्षता पथके   

Thane Municipal corporation
Thane Municipal corporation

ठाणे : पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सरकारने प्लॅस्टिकच्या उत्पादनांवर आणि वापरावर पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय नुकताच घेतला, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी सुरु केलेली नाही. मात्र,ठाणे महापालिकेने प्लॅस्टिक मुक्त ठाणे करण्याचा निर्धार केला असून यासाठी प्रभाग समितीनिहाय दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. तर, 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यावर निर्बंध असले तरी, 50 मायक्रॉनपेक्षा जाड प्लॅस्टिकसाठी व्यापाऱ्यांना वार्षिक 48 हजार रुपये शुल्क भरून नोंदणी करण्याचा फतवा जारी केला आहे. यात कुचराई करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

26 जुलैचा महाप्रलय असो किंवा यंदा झालेल्या 29 ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे नाले-गटारांमध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू तुंबल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्र्यांनी महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायद्यातील नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने प्लॅस्टिक वापरावर निर्बंध आणण्याचे ठरवले. त्यानुसार, ठाणे महापालिकेनेही प्लॅस्टिक बंदीसाठी पुढाकार घेतला असून प्रभाग समितीनिहाय दक्षता पथके स्थापन केली आहेत. प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त या पथकाचे अध्यक्ष असून उपमुख्य स्वच्छता निरीक्षक सदस्य सचिव, तर प्रदूषण निरीक्षक आणि कर निरीक्षक या पथकामध्ये सदस्य आहेत. हे पथक 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरी बँग आणि गुटखा, पान मसाला व तंबाखूसाठी प्लॅस्टिक पुड्यांचा वापर महापालिका क्षेत्रात करण्यास घालण्यात आलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करणार आहे. त्याचबरोबर अशा प्रकारची प्लॅस्टिकचा वापर अथवा प्लास्टिक उत्पादनाचा साठा आढळल्यास सदरहू विक्रेते अथवा पुरवठादारावर महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमाद्वारे गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त केला जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी 5 हजार व दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10 हजार प्रमाणे दंडात्मक कारवाई करून या कारवाईचा तपशील नागरिकांच्या माहितीसाठी पालिकेच्या संकेतस्थळावर आणि प्रभाग समितीमध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे.
 
प्लॅस्टिक वापरासाठी नोंदणी अनिवार्य
राज्य सरकारच्या 2006 च्या आणि केंद्र सरकारच्या 2016 च्या नियमांतील तरतुदीनुसार पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीची कडक अंमलबजावणी सुरु केली असली तरी, 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लॅस्टिक वापरासाठी विक्रेत्यांनी वार्षिक 48 हजार किंवा प्रतीमहिना 4 हजार शुल्क भरून नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर विक्रेत्यांनी ग्राहकांना अशा कॅरी बँग ग्राहकांना शुल्क आकारून उपलब्ध करून द्याव्यात.दरम्यान, जे विक्रेते प्लॅस्टिकचा वापर तसेच आयात-वितरण न करता पर्यावरणपूरक कॅरी बँगचा वापर करतील त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नोंदणी शुल्क आकरण्यात येणार नाही. मात्र, तशा प्रकारचा फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आस्थापनावर हे पथक करडी नजर ठेवणार आहे. अशी माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

ठाणे प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत प्लॅस्टिक कचरा विल्हेवाट प्रक्रिया आणि जनजागृती केली जात आहे.शिवाय,पुनर्चक्रीकरण न करता येणाऱ्या प्लॅस्टिक वेस्टपासून उर्जा निर्मिती,ऑईल तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत.
 - संजीव जयस्वाल, आयुक्त, ठामपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com