महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

शिवसेना-भाजपचे एकमत होण्याची शक्‍यता
मुंबई - मुंबईच्या महापौरपदासाठी 8 मार्चला दुपारी 12 वाजता निवडणूक होणार आहे. हे पद कोणत्या पक्षाकडे जाईल, याचा पेच अजूनही कायम आहे; मात्र शिवसेना-भाजप युतीची सत्ता पालिकेत पुन्हा आणून अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद वाटून घेण्याचा फॉर्म्युल्यावर उभय पक्षांचे एकमत होण्याची दाट शक्‍यता आहे.

शिवसेना-भाजपचे एकमत होण्याची शक्‍यता
मुंबई - मुंबईच्या महापौरपदासाठी 8 मार्चला दुपारी 12 वाजता निवडणूक होणार आहे. हे पद कोणत्या पक्षाकडे जाईल, याचा पेच अजूनही कायम आहे; मात्र शिवसेना-भाजप युतीची सत्ता पालिकेत पुन्हा आणून अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद वाटून घेण्याचा फॉर्म्युल्यावर उभय पक्षांचे एकमत होण्याची दाट शक्‍यता आहे.

पालिकेतील सत्ता राखण्यासाठी शिवसेनेसोबत तडजोड करण्याची गरज असल्याची बाब भाजप श्रेष्ठींच्या लक्षात आली आहे. त्यानुसार पालिकेतील सत्तेसाठी वाटाघाटी लवकरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. झाले गेले विसरून दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. अडीच - अडीच वर्षांचे महापौरपद या फॉर्म्युल्यावर एकमत होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. भाजपकडूनही आकड्यांची जुळवाजुळव होण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे; मात्र कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने युतीचा जुना डाव पुन्हा मांडण्याच्या शक्‍यता वर्तवली जाते.

पालिका सभागृहाची मुदत 9 मार्चलासंपत असल्याने महापौरपदाची निवडणूक 8 मार्चला होणार आहे. पालिका आयुक्तांनी निवडणुकीची तारीख निश्‍चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली येऊ नये, त्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेच्या अधिनियमानुसार तारीख निश्‍चित कराव, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी बुधवारी (ता.1) आयुक्तांकडे केली. निवडणुकीनंतर पहिले सभागृह बोलावण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना असतो. त्यामुळे सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी म्हणजे 9 तारखेला किंवा त्याच्या आदल्या दिवशी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना सभागृह बोलावण्याचा अधिकार होता. त्यानुसार राज्य सरकारच्या अधिसुचनेनुसार आणि मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला.

भाजपचा सावध पवित्रा
विरोधकांनी राज्य सरकारविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशा स्थितीत भाजपला युतीतील आपल्या जुन्या मित्राची गरज आहे. वैचारिक आधारावर असलेली युती तुटू नये, अशा सुचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून मिळाल्याचे समजते. त्यामुळे पालिका आणि राज्यातील सत्ता टिकावी, अस्थिर होऊ नये, युती तूटू नये, यासाठी आता भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.

Web Title: mayor 50-50 formula