जळगावात 'मेडिकल हब' उभारणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 एप्रिल 2017

राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; एक हजार 250 कोटी 60 लाख निधी उपलब्ध

राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; एक हजार 250 कोटी 60 लाख निधी उपलब्ध
मुंबई - जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) उभारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण, तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकाप्रमाणे प्रतिहजार लोकसंख्येसाठी चार डॉक्‍टर्स असणे आवश्‍यक आहे. राज्यात हे प्रमाण 0.64 इतके आहे. त्यामुळे राज्यात नवीन आरोग्य विज्ञान महाविद्यालयाची निर्मिती करून डॉक्‍टरांची संख्या वाढवणे आवश्‍यक आहे. उत्तर महाराष्ट्रात प्रति लाख लोकसंख्यामागे आरोग्य विज्ञान महाविद्यालयाची प्रवेशक्षमता अवघे 0.54 एवढी आहे. त्यामुळे जळगावात "मेडिकल हब' सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे महाजन यांनी सांगितले.

वैद्यकीय शैक्षणिक संकुल उभारणीसाठी महसूल विभागामार्फत मौजे चिंचोली शिवारातील 46.56 हेक्‍टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी एक हजार 250 कोटी 60 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या संकुलामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि होमिओपॅथी महाविद्यालयाचा समावेश असणार आहे. शासकीय आणि आयुर्वेद महाविद्यालयात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता, दंत आणि होमिओपॅथी महाविद्यालयात 50 विद्यार्थी प्रवेशक्षमता आणि भौतिकोपचार महाविद्यालयात 40 विद्यार्थी प्रवेश क्षमता असणार आहे. संकुलातील महाविद्यालये व रुग्णालयासाठी आवश्‍यक पदनिर्मिती करण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

नंदुरबारमध्ये महाआरोग्य शिबीर
नंदुरबार येथे आदिवासी भागात 30 एप्रिल, एक आणि दोन मे या तीन दिवशी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत उपचार आणि शस्रक्रिया करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाजन यांनी दिली.