हरवलेल्या आजीची सोशल मीडियामुळे झाली मुलाशी भेट 

aaji.jpg
aaji.jpg

भांडुप : हल्लीच्या युगात सोशल मीडिया इतर माध्यमांच्या तुलनेत प्रभावी होताना दिसत असल्याचे एका ताज्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. गावावरून आपल्या मुलाकडे उपचारासाठी आलेल्या 85 वर्षीय आजीबाईंना रस्ता भरकटल्यामुळे घर सापडत नव्हते. कावऱ्याबावऱ्या झालेल्या आजीला तिच्या घरी सोडण्यासाठी भांडुपच्या एका तरुणाने सोशल मीडियाचा आधार घेतला आणि अवघ्या काही तासांतच सहीसलामत त्यांच्या मुलाकडे सुपूर्द केले... "माझो झील इलो' असे म्हणत आजीबाईंनी आपल्या मुलाला कवेत घेतले, तेव्हा सोशल मीडियाची जादू पुन्हा एकदा अनुभवता आली. 

भांडुपच्या साईनगरमध्ये राहणाऱ्या साईनाथ परबला रस्त्यावर एक वृद्ध महिला काहीशा गडबडलेल्या अवस्थेत दिसल्या. न राहवून त्याने आपुलकीने आजीबाईंची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी "इथेच माझे घर आहे... इथून उतरले की रान लागते अन्‌ तिथेच मी राहते' असे मालवणी भाषेत त्याला सांगितले. एव्हाना आजीबाई रस्ता विसरल्या असल्याचे साईनाथच्या लक्षात आले. त्यांनी आपले नाव प्रभावती जगन्नाथ वेंगुर्लेकर असल्याचे सांगितले. मला तीन मुले आणि एक मुलगी असून, वेंगुर्ल्यातील दाभोली गावात राहत असल्याचेही त्या म्हणाल्या. बाकी त्यांना काही आठवत नव्हते. आजीबाईंचा हात पकडून साईनाथने तासभर शोध घेऊनही त्यांच्या घराचा पत्ता लागला नाही. साईनाथ त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार असल्याचे त्याच्या लक्षात आले. आजूबाजूला चौकशी करूनही काहीच पत्ता लागत नसल्याने साईनाथने "फेसबुक'वर आजीबाई हरवल्या असल्याची पोस्ट टाकली अन्‌ फोटो शेअर केला. पोस्ट व्हायरल होताच काही मिनिटांत त्याला एक दूरध्वनी आला. दूरध्वनीवर आजीबाईंचा मुलगा बोलत होता. त्याने आपली ओळख सांगितली आणि दोन्ही बाजूंनी सुटकेचा निश्‍वास सोडला. 

साक्षात देवदूतच भेटला 
कांजूरमार्गच्या शास्त्रीनगरमध्ये राहत असलेल्या अविनाश वेंगुर्लेकर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या आईला गावावरून उपचारासाठी आणले होते. पूर्वीपासूनच गावाच्या निसर्गसंपन्न वातावरणात राहिल्याने मुंबईच्या कृत्रिम झगमगाटात त्यांचे मन रमत नसल्याने त्या बाहेर पडल्या होत्या; मात्र मुंबईच्या गर्दीत बिनचेहऱ्याच्या माणसांमध्ये त्या काहीशा गांगरल्या. साईनाथच्या रूपात त्यांना साक्षात देवदूतच भेटला. समाजमाध्यमामुळेच अवघ्या दोन तासांतच एका मुलाची त्याच्या आईशी भेट झाली. अविनाश जेव्हा साईनाथच्या घरी पोहोचले तेव्हा आजीबाईंचे डोळे चमकले आणि त्या म्हणाल्या, "माझो झील इलो.' 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com