मेट्रो 5 मार्गाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासह शहरातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी एमएमआरडीएने विविध मेट्रो प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पांच्या मार्गांची मोजणी कमी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मेट्रो मार्गांचे सर्वेक्षण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार ठाणे-भिवंडी-कल्याण या प्रस्तावित मेट्रो 5 च्या मार्गाची मोजणीही ड्रोनद्वारे होणार आहे. स्वामी समर्थ नगर- जोगेश्‍वरी- विक्रोळी या मेट्रो 6 मार्गाच्या मोजणीसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. त्यानंतर प्रशासनाने ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रस्तावित मेट्रो 5 मार्गाची मोजणी करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. हा मार्ग 24.1 कि.मी.चा असेल. कंपन्यांना 17 एप्रिलपर्यंत निविदा भरता येणार आहेत. निविदा प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या कंपनीला या मार्गांचे सर्वेक्षण 60 महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे.