सराफाने घातला लाखोंचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नवीन पनवेल - पनवेल शहरातील गंठण ज्वेलर्सने व्यापाऱ्यांसह ग्राहकांना आठ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी ज्वेलर्सचा मालक नानालाल गुर्जर आणि त्याची पत्नी शाणू गुर्जर यांच्या विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, विश्‍वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल शहरातील महात्मा गांधी रोडवर असलेल्या श्री गंठण ज्वेलर्सच्या मालकाने सुकापूर येथे राहणाऱ्या जनाबाई चांगदेव ठाकूर यांनी गंठण ज्वेलर्समध्ये दागिने बनवायला दिले होते. त्यासोबत रोख रक्कमही दिली होती; मात्र ज्वेलर्स मालकाने शनिवारी (ता. १) रात्री आपल्या कुटुंबासह पोबारा केल्याचे लक्षात येताच जनाबाई यांनी ज्वेलर्स मालक नानालाल गुर्जर व त्याची पत्नी शाणू गुर्जर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

यासंदर्भात पनवेल शहरातील व्यापाऱ्यांनी पनवेल शहर पोलिसांना पत्र दिले आहे. गंठण ज्वेलर्स मालकाने तीन वर्षांपासून पनवेल व नवी मुंबईतील व्यापाऱ्यांकडून सोने खरेदी केले होते. त्याबदल्यात त्याने दोन कोटी सहा लाखांचे धनादेश व्यापाऱ्यांना दिले होते. 

धनादेश न वठल्याने व्यापाऱ्यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे दागिनेसुद्धा गहाण ठेवले होते. शनिवारी रात्री ज्वेलर्स मालकाने आपल्या कुटुंबीयांसह दुकानाला टाळे ठोकून पोबारा केल्याचेही या पत्रामध्ये नमूद केले आहे.

ज्वेलर्स मालक पळून गेल्याचे समजताच पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली आहे. त्याच्या दुकानाबाहेरही लोक आशेने येऊन उभे राहत आहेत.  त्यामुळे सध्या पोलिसांनी नोंदवलेल्या आठ लाखांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.