मोनो रेल मार्गाखाली पार्किंगचे अड्डे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई - चेंबूर - वडाळा- संत गाडगेमहाराज चौक या दरम्यान मोनो रेल मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. या मार्गावर खांब उभारण्यात आले असून त्याखाली नागरिकांकडून बेकायदा वाहने उभा करण्यात येत आहेत. यामुळे मोनोचा मार्ग हा बेकायदा पार्किंगचे अड्डे बनले असून त्यावर वाहतूक पोलिसांकडूनही कारवाई होत नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

मोनो रेलच्या पहिल्या टप्प्यातील वडाळा ते चेंबूर या मार्गावर मोनो धावू लागली आहे; तर दुसऱ्या टप्प्यातील वडाळा ते संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर काही महिन्यांमध्ये मोनो धावण्याची शक्‍यता आहे. या संपूर्ण मार्गावर मोनो मार्गासाठी खांब उभारण्यात आले असून त्याखाली नागरिकांकडून वाहने उभी करण्यात येत आहेत. यामुळे या मार्गाला पार्किंगचे स्वरूप आले आहे. प्रतीक्षानगर, सायन कोळीवाडा, ऍण्टॉप हिल चर्च, ऍण्टॉप हिल दर्गा, नायगाव, केईएम हॉस्पिटल, ना. म. जोशी मार्ग, आर्थर रोड, कस्तुरबा हॉस्पिटल या ठिकाणी मोनो रेलखाली वाहने उभी करण्यात येत आहेत. यामुळे आधीच लहान असलेल्या रस्त्यावर वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. 

दादर (पूर्व) मोनो रेल स्टेशन, वडाळा कात्रक रोड, वडाळा स्टेशन येथील वडाळा ब्रिज मोनो स्थानक येथे टॅक्‍सीचालक वाहने बेकायदा पार्किंग करत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे; तर परळ भोईवाडा येथील जी. डी. आंबेकर मार्गावरील नायगाव स्थानकाखालीही बेकायदा पार्किंग होत असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वरदहस्तामुळे वाहनचालकांवर कारवाई करण्यात पोलिसांना अडथळे येत आहेत. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर मोनो रेलचे खांब उभारण्यात आले असल्याने काही रस्त्यावरील दुतर्फा चालणारी वाहतूक आता विस्कळित झाली आहे. त्यामुळे वडाळा दर्गा येथे तर गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्याचप्रमाणे ना. म. जोशी मार्गावरही हीच परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

मोनो रेलच्या खांबाजवळ अनेक वाहने बेकायदा उभी करण्यात येत आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. बेकायदा वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वडाळा येथील रहिवासी संजय रणदिवे यांनी केली आहे. 

Web Title: Mono Rail corridor down the vehicle parking