पर्यावरण रक्षणासाठी भारताने जगाचे नेतृत्व करावे - जयराम रमेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - पर्यावरण बदलांबाबत झालेला पॅरिस करार हा ऐतिहासिक होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून बाहेर पडण्याची भूमिका घेतली असली, तरी भारताने ही संधी साधून पर्यावरण रक्षणाकरता जगाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी येथे व्यक्त केली.

ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने सोमवारी (ता. 10) "पॅरिस करार आणि पर्यावरण बदल' या विषयावर चर्चगेट येथील सभागृहात कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक नेतृत्व केवळ शब्दांचे बुडबुडे उडवणारे नसावे, तर ठोस कृतीतून जगाला मार्गदर्शन करणारे असावे, असा सल्लाही यावेळी रमेश यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना दिला. तुम्ही निसर्गाला सांभाळलेत तर तो तुम्हाला सांभाळेल; परंतु निसर्गाशी प्रतारणा केल्यास तोही धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पर्यावरणसंदर्भातील संवेदनशीलतेवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. 1972 मध्ये स्विडनमध्ये झालेल्या पर्यावरण बदलावरील पहिल्या जागतिक परिषदेत भारताच्या प्रतिनिधी म्हणून इंदिरा गांधी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी जगाला पर्यावरण बदलांबाबत सावध होण्याचा सल्ला दिला होता, अशी आठवणही रमेश यांनी सांगितली. पर्यावरणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पर्यावरणाला सार्वजनिक आरोग्याशी जोडा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

'बॅकबे'ला इंदिरांचा विरोध
मुंबईतील बॅकबे रिक्‍लेमेशनला इंदिरा गांधी यांचा प्रचंड विरोध होता. त्याऐवजी नवी मुंबई विकसित करा, असा सल्ला 45 वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना दिला होता, अशी आठवणही यावेळी जयराम रमेश यांनी सांगितली.