मुंबईत 17 छोटी अग्निशमन केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मुंबई - लोकसंख्येच्या प्रमाणात अग्निशमन केंद्रे अपुरी आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांना तत्काळ पोचता यावे, आग किंवा इतर आपत्तीपासून नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करता यावे, यासाठी छोटी 17 अग्निशमन केंद्रे लवकरच उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी कंटेनराईज्ड कार्यालयांचा वापर केला जाणार आहे. कंटेनरचा पुरवठा करण्यासंदर्भातचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

सव्वा कोटी लोकसंख्येपैकी 42 टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. यात बांबू, चटई, गॅस सिलिंडर, प्लॅस्टिक आदी ज्वलनशील साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. झोपडपट्टीतील रस्ते अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाच्या गाड्या पोचण्यास अडथळा येतो. त्यामुळे दुर्घटनेवेळी त्वरित मदतकार्य करण्याकरिता काही मोक्‍याच्या ठिकाणी छोटी अग्निशामक केंद्रे उभारावीत, अशी शिफारस अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या वस्तुशोधक समितीने केली होती.