ग्रंथसंग्रहालयाची वाताहत

ग्रंथसंग्रहालयाची वाताहत

मुंबई - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आज मुंबईत ३१ शाखा कार्यरत आहेत; मात्र दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीची पार दुरवस्था झाली आहे. ग्रंथसंग्रहालयाचा काही भाग मोडकळीस आला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्‍यात आहे. विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत घेऊन ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करावा लागत आहे. ग्रंथालयाच्या विश्‍वस्त मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा समावेश असूनही इतकी महत्त्वाची वास्तू दुर्लक्षित राहिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची दादर-नायगावमधील विभागाच्या इमारतीची वास्तू स. का. पाटील यांनी ग्रंथालयास दिली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १० मार्च १९५९ मध्ये ग्रंथालयाचे उद्‌घाटन झाले. सध्या मात्र ग्रंथालयाची भयावह स्थिती असून, आजूबाजूला फेरीवाल्यांचे आणि दुकानदारांचे अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणांमुळे ग्रंथालयाचे अस्तित्व शोधावे लागते इतपत गंभीर स्थिती आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची इमारत मोडकळीस आली असून तिची तात्पुरती डागडुजी सुरू आहे. इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी गळते. जास्त पाऊस असेल तर पुस्तके भिजतात, अशी माहिती ग्रंथालयाचे कार्यवाह प्रेमानंद भाटकर यांनी दिली. ग्रंथालय पहिल्या मजल्यावर असून खालील बाजूस दुकाने आहेत. ग्रंथालयात गेल्यास भीषण स्थिती दिसत नसली तरी इमारतीच्या मागच्या बाजूस गेल्यास तिची दुरवस्था नजरेस पडते. खचलेल्या भिंती पाहण्यास मिळतात. इमारतीची स्थिती इतकी बिकट आहे की, भिंतींतून विटा बाहेर आल्या आहेत. इमारतीच्या भिंतीवर झुडपेही उगवली आहेत. त्यांची मुळेही आतपर्यंत रुतली आहेत. भिंत धोकादायक असतानाही इमारतीच्या मागील बाजूस दुकानदारांच्या वातानुकूलित यंत्राचे कॉम्प्रेसर लावण्यात आले आहेत. मोठमोठ्या कॉम्प्रेसरचे वजन झेपण्याची इमारतीच्या भिंतीची क्षमता नाही. 

सात-बाराही नावावर नाही
तीन महिन्यांपूर्वी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मध्यवर्ती शाखेत विश्‍वस्त मंडळाची बैठक झाली. त्या वेळी दादर स्वायत्त विभागाच्या इमारतीच्या सात-बारामध्ये ग्रंथालयाचे नाव नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली, अशी माहिती प्रेमानंद भाटकर यांनी दिली. इमारतीच्या विकासासाठी एका विकसकाला विश्‍वस्त मंडळाने ५० लाखांचा निधी दिला आहे; पण काही तांत्रिक कारणांमुळे कामाला सुरुवात झालेली नाही, असेही भाटकर म्हणाले. इमारतीचा विकास करण्यामध्ये कोणती अडचण आहे, असा प्रश्‍न भाटकरांना  केली असता त्यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला.

दुरवस्थेची दखल
ग्रंथालयामध्ये ५७ हजार ग्रंथसंपदा असून अभ्यासिकेचा लाभ १०० पेक्षा जास्त मुले घेतात. अभ्यासिका ३६५ दिवस सुरू असते. ग्रंथालयाच्या इमारतीच्या दुरवस्थेची दखल ग्रंथालयाच्या विश्‍वस्त मंडळाने घेतली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com