वाढलेल्या टक्‍क्‍याचा धक्का कोणाला?

वाढलेल्या टक्‍क्‍याचा धक्का कोणाला?

मुंबई - मतदारयादीतील घोळ... मुंबईत तब्बल 11 लाख नावे गायब असल्याची तक्रार... त्यावरून सुरू असलेले वाद... याद्यांतील नावे शोधताना होणारी दमछाक...मतदान यंत्रांमधील बिघाड... उन्हाचा तडाखा... अशा गोंधळी वातावरणात मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर या महापालिका तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.21) मतदान झाले. सर्वच पक्षांनी केलेला आक्रमक-सुनियोजित प्रचार... मतदारांना मतदानकेंद्रांपर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची चाललेली धावपळ... मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोग-स्वयंसेवी संस्थांबरोबरच सेलिब्रेटींनी केलेला जागर याचा सकारात्मक परिणाम म्हणून या निवडणुकांत मतदानाचा टक्का वाढला.

झोपडपट्टीवासीयांपासून पवईतील हिरानंदानी संकुलातील उच्चभ्रूंच्या वस्त्यापर्यंत एक दिवसाचा राजा असलेला मतदार लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यासाठी उतरलेला दिसला. मतदानाचा हा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना धक्का देत परिवर्तन घडवून आणणार; की त्यांच्याकडेच पुढील पाच वर्षांसाठी जहागिरी सोपवणार, हे उद्या, गुरुवारी (ता.23) होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर कब्जा करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेला संघर्षामुळे राज्य सरकारचे भवितव्यच जणू पणाला लावणाऱ्या मुंबईतील 227 जागांसाठी सरासरी 55 टक्के मतदान झाले. गेल्या वेळी हा टक्का 44-45 होता. ठाण्यातील 131 जागांसाठी सरासरी 56, उल्हासनगरमध्ये 78 जागांसाठी सरासरी 47 तर रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी तसेच 15 पंचायत समित्यांच्या 118 जागांसाठी सरासरी 75 टक्के मतदान झाले. नवमतदारांपासून 90 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत सर्वच जण उत्स्फूर्तपणे मतदानासाठी रांगेत उभे राहिलेल्याने या टक्‍क्‍यात वाढ झाली. कमी मतदान सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणारे... मतदानाचा वाढलेला टक्का त्यांना धडकी भरवणारा असतो, हे आजवरचे समीकरण यंदाही कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com