भरतीतून महापालिकेची कमाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

मुंबई - महापालिका कामगार भरतीतून तब्बल तीन कोटी रुपयांची कमाई करणार आहे. पालिकेत एक हजार ३८८ कामगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्कातून पालिकेला हा फायदा होणार आहे. कामगारांच्या एक वर्षाच्या वेतनाहून अधिक उत्पन्न यातून मिळणार आहे.

मुंबई - महापालिका कामगार भरतीतून तब्बल तीन कोटी रुपयांची कमाई करणार आहे. पालिकेत एक हजार ३८८ कामगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्कातून पालिकेला हा फायदा होणार आहे. कामगारांच्या एक वर्षाच्या वेतनाहून अधिक उत्पन्न यातून मिळणार आहे.

पालिका कामगार, कक्ष परिचारक, हमाल, आया, बहुद्देशीय कामगार, स्मशान कामगार अशा विविध विभागांत कामगारांची ऑनलाईन पद्धतीने भरती करणार आहे. यापूर्वी झालेल्या भरतीत दोन लाख ८९ हजार अर्ज प्राप्त झाले होते. या भरती प्रक्रियेत चार लाख उमेदवार सहभागी होण्याची शक्‍यता आहे. त्यातून तब्बल २४ कोटी रुपयांचे शुल्क जमा होईल, असा पालिकेचा अंदाज आहे; तर ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणाऱ्या महाऑनलाईन या संस्थेला पालिका २० कोटी ८६ लाख रुपये देणार आहे. २००९ मध्ये झालेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड वर्षांहून अधिक काळ लागला होता. त्यामुळे पहिल्यांदाच कामगारांची भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. कामगारांना पहिल्या वर्षी १५ ते १६ हजार रुपयांचे वेतन असते; तर ऑनलाईन भरती करणाऱ्या कंपनीला शुल्क दिल्यानंतरही पालिकेकडे तीन कोटी १३ लाख रुपये जमा होणार आहेत. वेतनापोटी या एक हजार ३८८ कामगारांवर पालिका दोन कोटी २२ लाख रुपये खर्च करणार आहे. म्हणजे उमेदवारांनी दिलेल्या शुल्कातूनच पालिका भरती होणाऱ्या कामगारांना वेतन देणार आहे.

पालिकेने शुल्क आकारून बेरोजगारांची थट्टा केली आहे. पालिका ही नफा कमावणारी कंपनी नाही, तर सुविधा पुरविणारी संस्था आहे. त्यात भरती करण्यासाठी शुल्क आकारण्याची गरजच काय? हा मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा गंभीर प्रकार आहे.
- मिलिंद रानडे, कचरा वाहतूक संघ

या विभागांसाठी भरती 
 उपजल अभियंता (परीक्षण)-२६०
 उपजल अभियंता (प्रचालने)- ३७
 उपजल अभियंता (पिसे पांजरापोळ)- ४८
 उपजल अभियंता  
(भांडुप संकुल )- २६
 उपजल अभियंता 
(मुंबई प्रकल्प ३ ए)- १८
 उप जल अभियंता (बांधकामे)- ७६
 विभाग कार्यालयातील 
पाणी विभाग-२७८
 मलनि:सारण व प्रचालने-४९६ 
 रुग्णालये (केवळ पाच रुग्णालयांसाठी)- ८०
 आरोग्य खाते (स्मशाणभूमीसाठी)- ६० 
असे असेल प्रवेश शुल्क 
 खुला प्रवर्ग - ८०० रुपये - 
मागास आणि इतर मागास प्रवर्ग- ४०० रुपये