गुणपत्रिका मिळण्यासाठी दोन आठवडे प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

उच्च न्यायालयात मुंबई विद्यापीठाची माहिती

उच्च न्यायालयात मुंबई विद्यापीठाची माहिती
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांचा गोंधळ आणखी काही दिवस चालू राहणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच बुधवारी (ता. 6) विद्यापीठाने मुंबई उच्च न्यायालयात केले. निकाल जाहीर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे; मात्र गुणपत्रिका मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान दोन आठवडे (ता.19) प्रतीक्षा करावी लागू शकते, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.

विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्यासाठी प्राध्यापक व कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, मधेच आलेले उत्सव, पाऊस आणि सुट्या यामुळे पेपर तपासणीला उशीर झाला, असे कारण आज विद्यापीठातर्फे न्यायालयात देण्यात आले. सुद्युम्न नारगोळकरसह अन्य काही विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वतंत्र याचिकांवर न्यायाधीश अनुप मोहता आणि भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. एकूण 477 पैकी 464 निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरित निकालही पाच दिवसांत जाहीर होतील; मात्र विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका प्रत्यक्ष मिळण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 19 सप्टेंबरपर्यंत सर्व सुरळित होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. निकालाच्या तारखेच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने सीईटी परीक्षेची मुदत 22 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे.