सिलिंडरच्या स्फोटात 20 झोपड्या खाक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - रे रोड येथील दारूखाना लकडा बंदरमधील साईकृपा रहिवासी संघ झोपडपट्टीतील एका झोपडीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने तब्बल 20 झोपड्या जळून खाक झाल्या. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी घडली. मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. साईकृपा रहिवासी संघ झोपडपट्टीतील रहिवासी विदेशी हे घर बंद करून कामाला गेले होते. ते गॅस बंद करण्यास विसरले होते. स्फोट होताच आजूबाजूच्या घरांतील रहिवासी बाहेर पळाले. आग पसरल्याने एका घरातील तीन कमर्शियल सिलिंडरचाही स्फोट झाला.

त्यामुळे आग वेगाने पसरली. जवळपासच्या घरांतील विजेचे मीटर व सिलिंडर रहिवाशांनी प्रसंगावधान राखून बंद केले. या दुर्घटनेत 20 झोपड्या जळून खाक झाल्या. भायखळा, शिवडी व बीपीटी अग्निशामक दलाच्या 10 बंबांनी ही आग विझवली. विदेशी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती शिवडीचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर नावगे यांनी दिली.